वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी येथील खानोली-कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालय रस्त्यासाठी नियमबाह्य कागदपत्रे सादर करून शासन निर्णय धाब्यावर बसवत या रस्त्याचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये समावेश करत शासनाचा १ कोटी ७२ लाख निधी खर्च करण्याच्या कामाला तात्काळ स्थगिती देऊन दोषी अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करत झालेल्या व केल्या जाणा-या सर्व खर्चाची रक्कम संबंधित अधिका-यांकडून वसूल करण्यात यावी अशी मागणी वेंगुर्ला येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल यांनी कोकण विभागीय आयुक्त व महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
खानोली-कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालय या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून प्रस्तावित असलेल्या रस्त्याचे काम नियमबाह्य पद्धतीने होत असल्याने सन २०१८ पासून योगेश तांडेल हे प्रशासनाचे लक्ष वेधून घेत आहेत. वारंवार लक्ष वेधून देखील त्याची दखल घेतली जात नसल्याने योगेश तांडेल यांनी १५ नोव्हेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे बेमुदत उपोषण केले. त्यानंतर लेखी आश्वासन देऊन सुद्धा कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग यांनी पुन्हा एकदा काम हाती न घेतल्याने १ मे २०२२ रोजी महाराष्ट्रदिनी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे योगेश तांडेल यांनी लाक्षणिक उपोषण केले होते. यावेळी तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांना याविषयी लक्ष देण्याच्या सूचना केल्या होत्या तसेच जिल्हाधिकारी यांना देखील याबाबत अनेक वेळा लेखी निवेदने देऊन सुद्धा त्यावर अद्याप पर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने व राजकीय दबावा पोटी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग व क्षत्रिय कंट्रक्शन कोल्हापूर हे शासन नियम धाब्यावर बसवून रस्त्याचे काम उरकून घेण्याच्या प्रयत्नात असल्याने सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल यांनी थेट कोकण आयुक्त व महाराष्ट्र
राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
खाजगी जमीन अथवा वनविभागाची ना हरकत पमाणपत्र आवश्यक असलेल्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात येऊ नये याबाबत पुनश्च खात्री करण्यात यावी असा शासन निर्णयांमध्ये स्पष्ट उल्लेख असताना देखील शासन निर्णय अधिका-यांनी धाब्यावर बसवून शासनाचा करोडो रुपये निधी हडप करण्याचा घाट घातल्याचे दिसून येत आहे असे निवेदनात म्हटले आहे.
फोटोओळी – खानोली-कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालय रस्त्याबाबत योगेश तांडेल यांनी अजित पवार यांना निवेदन दिले.


