सिंधुदुर्ग सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी करणारी कर्नाटकची नौका जप्त
देवगड प्रतिनिधी
परप्रांतीय नौकांद्वारे होणाऱ्या बेकायदा मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्य विभाग कठोर कारवाई करत आहे. याच धोरणाचा भाग म्हणून, आज पहाटे देवगडसमोर महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ट्रॉलिंगद्वारे अनधिकृत मासेमारी करणाऱ्या कर्नाटक राज्यातील एका मासेमारी नौकेवर यशस्वी धडक कारवाई करण्यात आली.
सदर नौका महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत कोणताही वैध परवाना न घेता ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करताना आढळली. नौकेवर तांडेलसह एकूण ७ खलाशी उपस्थित होते. नौका ताब्यात घेऊन ती देवगड बंदरात सुरक्षित आणण्यात आली आहे. नौकेवर सापडलेल्या मासळीचा लिलाव प्रक्रिया सुरू असून, प्रकरणाचा सविस्तर अहवाल माननीय सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्याकडे प्रतिवेदन दाखल केला जाईल. सुनावणीनंतर नौकामालक व संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
ही यशस्वी कारवाई श्री. किरण वाघमारे, अंमलबजावणी अधिकारी तथा सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी (परवाना अधिकारी, देवगड) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली. त्यांना सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व रक्षक श्री. टुकरुल, श्री. खवले, श्री. फाटक, श्री. बांधकर, श्री. नेसवंकर आणि श्री. सावजी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ही कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग श्री. सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास नेली गेली.
उल्लेखनीय बाब म्हणजे, या मासेमारी हंगामातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परप्रांतीय नौकेवरील ही सहावी मोठी कारवाई आहे. यापूर्वीच्या कारवायांप्रमाणेच विभागाने आपली सक्षमता व सजगता पुन्हा सिद्ध केली आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाच्या या सततच्या कठोर प्रयत्नांमुळे स्थानिक मच्छीमारांचे हित सुरक्षित राहत असून, सागरी जैवविविधतेचे संरक्षणही प्रभावीपणे होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय विभागाचे मंत्री श्री. नितेश राणे यांच्या दिशानिर्देशनात विभागाचे अधिकारी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सक्रिय व कठोर भूमिका घेताना दिसत आहेत.


