सिडकोकडून तारघर, बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्थानकांचा ताबा मध्य रेल्वेकडे

0
7
सिडकोकडून तारघर, बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्थानकांचा ताबा मध्य रेल्वेकडे
सिडकोकडून तारघर, बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्थानकांचा ताबा मध्य रेल्वेकडे

सिडकोकडून तारघर, बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्थानकांचा ताबा मध्य रेल्वेकडे

नवी मुंबई –
 नवी मुंबईतील प्रवाशांसाठी महत्त्वाची घडामोड घडली असून सिडकोने ‘तारघर’, ‘बामणडोंगरी’ आणि ‘खारकोपर’ ही तीन प्रमुख रेल्वे स्थानके अधिकृतपणे मध्य रेल्वेकडे हस्तांतरित केली आहेत. या निर्णयामुळे स्थानकांच्या देखभाल-दुरुस्ती आणि प्रवासी सुविधांबाबतचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या हस्तांतरणामध्ये स्थानक इमारती, स्थानकांसमोरील मोकळी जागा (फोरकोर्ट्स), दूरसंचार प्रणाली तसेच इतर संबंधित पायाभूत सुविधांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता या स्थानकांच्या देखभाल, स्वच्छता, दुरुस्ती आणि सुविधा उन्नतीकरणाची जबाबदारी मध्य रेल्वेकडे राहणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून या स्थानकांवरील सुविधांच्या अभावाबाबत आणि देखभालीतील त्रुटींविषयी प्रवाशांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. स्थानकांचे व्यवस्थापन सिडकोकडे आणि रेल्वे सेवा मध्य रेल्वेकडे असल्याने अनेक प्रश्नांच्या निराकरणात अडचणी निर्माण होत होत्या. आता हा पेच संपुष्टात आल्याने प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, मध्य रेल्वेने वाशी-पनवेल कॉरिडॉरवरील सिडकोकडे असलेल्या उर्वरित रेल्वे स्थानकांचाही संपूर्ण ताबा आणि देखभालीची जबाबदारी स्वीकारण्याची मागणी केली आहे. या संदर्भात सिडको आणि रेल्वे प्रशासनामध्ये पुढील चर्चा सुरू असल्याचे समजते.
रेल्वे प्रशासनाच्या या पावलामुळे नवी मुंबईतील उपनगरी रेल्वे प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज स्थानकांचा लाभ मिळणार असून भविष्यात स्थानकांच्या आधुनिकीकरणालाही गती मिळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here