सिम्बायोसिसचा २३ वा दीक्षान्त समारंभ; उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

0
7
सिम्बायोसिसचा २३ वा दीक्षान्त समारंभ; उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सिम्बायोसिसचा २३ वा दीक्षान्त समारंभ; उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

 सिम्बायोसिसचा २३ वा दीक्षान्त समारंभ; उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचा २३ वा दीक्षान्त समारंभ उत्साहात; ३२ हजार विद्यार्थ्यांपैकी १९ हजारांहून अधिक महिला

पुणे :
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचा २३ वा दीक्षान्त समारंभ उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सिम्बायोसिसचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. एस. बी. मुझुमदार, विद्यापीठाच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण आणि वैद्यकीय व आरोग्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर उपस्थित होते.

शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे किंवा रोजगाराचे साधन नसून व्यक्तीचे चारित्र्य घडविणारे, नैतिक मूल्यांची जपणूक करणारे आणि समाजाप्रती जबाबदारीची जाणीव निर्माण करणारे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी न करता समाजकल्याण आणि राष्ट्रउभारणीसाठी करावा, असे आवाहन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
व्यावसायिक यश महत्त्वाचे असले तरी चारित्र्य, प्रामाणिकपणा आणि नैतिक मूल्यांना तितकेच महत्त्व आहे. आयुष्यात कितीही मोठे यश मिळविले तरी आपल्या मूल्यांशी तडजोड करू नये. विद्यार्थ्यांनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती जोपासावी, आव्हानांना धैर्याने सामोरे जावे आणि प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करावा, असेही उपराष्ट्रपती म्हणाले.
समाजातील गरजू व्यक्तींना मदत करणे, इतरांच्या प्रगतीत हातभार लावणे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करणे यातच खरा आनंद आणि यश सामावलेले आहे. विद्यार्थ्यांनी जगात कुठेही गेले तरी भारतीय संस्कृती, परंपरा आणि मूल्यांचा अभिमान बाळगावा. आपल्या वर्तनातून आणि कार्यातून भारताची प्रतिमा उंचावावी, असे आवाहन त्यांनी केले.
सिम्बायोसिसमध्ये शिक्षण घेणाऱ्या ३२ हजार विद्यार्थ्यांपैकी १९ हजारांहून अधिक महिला असल्याचा उल्लेख करताना शिक्षण क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग ही अभिमानास्पद बाब असल्याचे उपराष्ट्रपतींनी नमूद केले.
यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल परिवर्तन, जैवतंत्रज्ञान आणि आधुनिक विज्ञानामुळे जगात वेगाने बदल घडत असल्याचे सांगितले. या बदलांचा स्वीकार करताना तंत्रज्ञानासोबत मानवी मूल्ये, नैतिकता, करुणा आणि सामाजिक जबाबदारी जपणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात केवळ तांत्रिक ज्ञान असणाऱ्यांचे नव्हे, तर ज्ञानासोबत विवेक, नवकल्पनांसोबत करुणा आणि महत्त्वाकांक्षेसोबत प्रामाणिकपणा जपणाऱ्यांचे जग असेल, असे प्रतिपादन राज्यपालांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here