सुनेत्रा पवार यांच्या हस्ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ७०व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

0
6
सुनेत्रा पवार यांच्या हस्ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ७०व्या गळीत हंगामाचा शुभारंभ
सुनेत्रा पवार यांच्या हस्ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ७०व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

सुनेत्रा पवार यांच्या हस्ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ७०व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

शेतकऱ्यांना चांगला ऊसदर देण्यासाठी आर्थिक शिस्त, उत्पादन खर्चावर नियंत्रण आणि उपपदार्थांमधून उत्पन्नवाढीवर भर

माळेगाव, बारामती :
ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि साखर उद्योगासाठी नव्या आशा घेऊन आलेल्या दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ७०व्या गळीत हंगामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते गव्हाण पूजन करून करण्यात आला. यावेळी कारखान्याची आर्थिक क्षमता वाढविणे, सभासदांचे हित जपणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ऊस उत्पादनात वाढ करणे यावर भर देण्यात आला.

 

स्वर्गीय अजितदादांनी सहकाराला शेतकऱ्यांच्या उन्नतीचे प्रभावी माध्यम मानून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले. त्यांच्यानंतर चेअरमनपदाची जबाबदारी स्वीकारताना त्यांनी निर्माण केलेला विश्वास, विचार आणि सहकाराची परंपरा जपत सभासदांच्या हितासाठी कारखाना अधिक सक्षम करण्याचा संकल्प केला असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
यंदा कारखान्याच्या इतिहासातील सर्वाधिक ऊसदर देण्यात आला. भविष्यातही शेतकऱ्यांना चांगला दर देता यावा, यासाठी आर्थिक शिस्त राखणे, उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवणे, उपपदार्थांमधून उत्पन्न वाढविणे आणि सीबीजी (कॉम्प्रेस्ड बायोगॅस) प्रकल्पावर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
ऊस उत्पादनवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
ऊसतोडणी आणि वाहतुकीचे योग्य नियोजन करून सभासदांचे नुकसान टाळण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच ठिबक सिंचन, पाण्याचा काटकसरीने वापर, जमिनीतील ओलावा टिकविणे, कृषितज्ज्ञांचे मार्गदर्शन, सुधारित ऊस जाती, योग्य खत व्यवस्थापन आणि शास्त्रीय पद्धतीने लागवड या उपायांद्वारे ऊस उत्पादन वाढविण्यावर भर राहील, असे त्यांनी सांगितले.
कारखान्याची कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढविणे, साखरेवरील अवलंबित्व कमी करणे आणि तरुण पिढीला आधुनिक शेती व तंत्रज्ञानाशी जोडणे या माध्यमातून कारखाना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळसदृश परिस्थितीत सामूहिक प्रयत्नांचे आवाहन
दुष्काळसदृश परिस्थिती आणि साखर उद्योगासमोरील विविध आव्हानांवर मात करून गळीत हंगामाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी शेतकरी, कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. काटेकोर नियोजन, उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर आणि सामूहिक प्रयत्नांतून यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्याचे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले. यावेळी त्यांनी संचालक मंडळ आणि कामगारांना पूर्ण क्षमतेने काम करण्याचेही आवाहन केले.
स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी रोड स्वीपिंग मशीन
या कार्यक्रमादरम्यान एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, धो. आ. सातव कारभारी फाउंडेशन, महालक्ष्मी उद्योग समूह, I.I.F.L. आणि I Care फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कारखान्याला उपलब्ध करून देण्यात आलेल्या रोड स्वीपिंग मशीनचे पूजन करून ती प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली. कारखाना परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी या मशीनचा उपयोग होणार आहे.
यानंतर सुनेत्रा पवार यांनी कारखाना परिसराची पाहणी करून विविध बाबींची माहिती घेतली. शेतकऱ्यांचे हित, कामगारांचे सहकार्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि आर्थिक शिस्त यांच्या बळावर कारखान्याची प्रगती साधण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here