सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना काल रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
तपासणीनंतर थंडी आणि वाढलेल्या प्रदूषणाच्या एकत्रित परिणामामुळे त्यांच्या ब्राँकियल अस्थमाची तीव्रता काही प्रमाणात वाढल्याचे निदान झाले. खबरदारीचा उपाय म्हणून पुढील निरीक्षण व उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सध्या त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून त्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांच्यावर प्रतिजैविके तसेच इतर आवश्यक सहाय्यक औषधोपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
सोनिया गांधी यांना रुग्णालयातून घरी कधी सोडायचे, याचा निर्णय त्यांच्या प्रकृतीतील सुधारणा लक्षात घेऊन उपचार करणारे डॉक्टर घेतील. पुढील एक-दोन दिवसांत त्यांना घरी पाठवण्याची शक्यता असल्याचे सर गंगा राम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी सांगितले.


