स्कॉर्पियो दुचाकी टक्कर की हुल? वादाच्या ठिणगीनं पेटला राडा
सावंतवाडीमध्ये मतदानाचा दिवस… आणि अचानक शहराच्या मध्यवर्ती भागात निवडणुकीचा माहोल क्षणात दंगलमय! कार्पिओने शिवसेना कार्यकर्त्याच्या दुचाकीवर हुल दिल्याचा आरोप होताच भाजप–शिंदे सेनेचे शेकडो कार्यकर्ते संतापाने पेटले. सालईवाडा काही क्षणांतच रणांगण बनलं—वादावादीची ठिणगी थेट धुमश्चक्रीत परिवर्तित झाली, दोन्ही गट आमने–सामने आल्याने हवेत तणावाचे ठिणगे उडत होते. पोलिस फौजफाटा घटनास्थळी धावला, पण राजकीय राड्याची आग एवढी भडकली होती की शांत सावंतवाडी अक्षरशः हादरून गेली!

सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपत येत असतानाच शहराच्या राजकीय वातावरणात अचानक खदखदलेला बारूद पेटला आणि संपूर्ण परिसर क्षणार्धात दंगलमय झाला. मंगळवारी सायंकाळी वनविभाग कार्यालयासमोरील रस्त्यावर घडलेला एकच प्रसंग, भाजपच्या ताफ्यातील स्कॉर्पियोने शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या दुचाकीवर हुल दिल्याचा आरोप आणि शांततेत चाललेली मतदान प्रक्रिया थेट धुमश्चक्रीच्या गर्तेत कोसळली. काही क्षणांतच शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, दोन्ही गटांचे नेते घटनास्थळी धावत आले, शिवीगाळ, ढकलाढकली, गोंधळ, धमक्या… सावंतवाडीची हवा तणावाने गडद झाली. निवडणुकीच्या दिवशी अशी भीषण परिस्थिती निर्माण होणे हे शहरासाठी अभूतपूर्व होते.
घडामोडी एवढ्या वेगाने घडल्या की अगदी पोलिस फौजफाट्यालाही काही क्षण परिस्थितीचा अंदाज येईना. विशाल परब यांच्या ताफ्यातील काळी स्कॉर्पियो पोलीस ठाण्याकडून सालईवाडा बाजूने येत होती. त्याच वेळी दुचाकीवरून जात असलेल्या शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्याला कारने हुल दिल्याचा आरोप होताच शेकडो लोकांच्या नजरा त्या दिशेला वळल्या. कार दुचाकीस घासून गेल्याची शक्यता समोर येताच संतप्त कार्यकर्त्यांनी क्षणात त्या वाहनाला घेराव घातला. कारच्या पुढे, मागे, दोन्ही बाजूने कार्यकर्त्यांनी कोंडाळे घातल्याने चालक आणि अंगरक्षक आतच अडकले. एका क्षणात दोन्ही गटांचे नारे, आरोळी, शिवीगाळ संपूर्ण परिसरात घुमू लागली. अंगरक्षकावर हात उगारल्याची माहिती पुढे आली आणि राड्याला आणखी तीव्रता मिळाली.
शहरात मतदानाचा ओघ सुरू असताना अचानक उभारलेल्या या परिस्थितीने प्रशासनाच्या हातापायांत गोंधळ उडाला. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण स्वतः पथकासह धावत घटनास्थळी आले आणि दोन्ही गटांना मागे हटवण्याचा प्रयत्न केला; पण राजकीय ‘प्रतिष्ठा’ आणि ‘दादागिरी’चा खेळ इतका बेशिस्त झाला होता की कोणाचीही ओरड, कोणताही इशारा कार्यकर्त्यांच्या कानावर पडत नव्हता. शेकडो बघे जमा झाल्याने वातावरण आणखी तापले. कारमध्ये भाजपचे झेंडे आढळताच शिंदे गटाचा रोष प्रचंड वाढला आणि कार जप्त करावी, चालकाला अटक करावी या मागण्यांच्या आरोळ्या सुरू झाल्या.
दरम्यान भाजपचीही बाजू समोर आली. अमरीश यादव यांनी तक्रार देत सांगितले की कार अडवून २०–२५ जणांनी दमदाटी, शिवीगाळ आणि मारहाण केली. दुसरीकडे ज्ञानेश पाटकर यांच्या तक्रारीनुसार कार चालवत असलेल्या चालकानेच दुचाकी ढकलण्याचा प्रयत्न केला आणि भाजपचे कार्यकर्ते धमक्या देऊ लागले. दोन्ही गटांच्या परस्परविरोधी तक्रारींमुळे पोलिसांवर ताण वाढला, आणि घटनास्थळापासून पोलिस ठाण्यापर्यंत तणावाची लाट पसरली.
घटनास्थळावरचा गोंधळ आवरला जात असतानाच दुसरा राडा थेट पोलिस ठाण्यात पेटला. रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटांचे शेकडो कार्यकर्ते पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. तक्रार कोण आधी करणार, कोणते कलम लागू करणार, कोणते व्हिडिओ पुरावे दाखवले जाणार यावरून पोलिसांच्या प्रांगणातच पुन्हा ढकलाढकली सुरू झाली. मनाई आदेशाचा भंग करून पोलिस ठाण्यातच शांतता भंग केल्याबद्दल दोन्ही गटांतील ४०–५० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मतदानाचा दिवस संपता संपता शहराची कायदा-सुव्यवस्था धोक्यात येईल का, अशी भीती निर्माण झाली होती.
शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी संताप व्यक्त करताना पोलिस यंत्रणेवर थेट निशाणा साधला. सकाळपासून छोटे-मोठे प्रकार सुरू होते, पोलिसांनी वेळेत पावले उचलली असती तर शहर अशांत झाले नसते. आमच्या कार्यकर्त्यावर कार घातली, हा प्रकार योजनाबद्ध वाटतो. आम्ही संयम राखला म्हणून शहरात दंगल उसळली नाही. त्यांच्या या वक्तव्यानेही शहरात चर्चांची ठिणगी पेटली. दुसरीकडे भाजपचा दावा तितकाच टोकाचा, निखळ हल्ला आमच्यावर झाला, कार थांबवून धमक्या देण्यात आल्या, अशी प्रतिक्रिया देत भाजपनंही गुन्हा नोंदवला.
निवडणुकीच्या दिवशी अशा प्रकारचे दृश्य पाहण्याची सवय नसलेल्या सावंतवाडीसाठी हा अनुभव धक्कादायक होता. दिवसभर प्रभाग ७ मध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून झालेली धक्काबुक्की, प्रभाग ९ मधील अंतिम टप्प्यातला हा मोठा संघर्ष. या सर्व घटनांनी नगरपरिषद निवडणुकीच्या शुचितेलाच जणू गालबोट लावले. प्रशासनावर सतत टीका होत राहिली की मतदानादिवशी कार्यकर्त्यांच्या अनियंत्रित वागणुकीवर का लगाम घातला गेला नाही.
रात्र वाढत गेली तसा पोलिस ठाण्यातील तापही वाढत गेला. दोन्ही गट आपापले पुरावे, साक्षीदार, मोबाईल व्हिडिओ घेऊन पोलिसांकडे धाव घेत होते. शेवटी पोलिसांनी संबंधित कार जप्त करत दोन्ही बाजूंवरील तक्रारी स्वतंत्रपणे नोंदवल्या. सुमारे मिळून शंभरहून अधिक कार्यकर्त्यांवर शांतताभंग, मारहाण, धमकी, अवैध जमावबंदी यांसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. पुढील चौकशीसाठी सिसिटीव्ही फूटेज, व्हिडिओ रेकॉर्डिंग, प्रत्यक्षदर्शींचे जबाब यांची पडताळणी सुरू आहे.
निवडणूक प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी राजकीय अतिरेकाच्या धुरळ्यात सावंतवाडीचा चेहरा झोकाळून गेला. शहराची शांतता एका क्षणात उद्ध्वस्त कशी होऊ शकते आणि राजकीय वैमनस्य किती वेगाने रस्त्यावर उतरतं याचं भयावह उदाहरण या घटनेने पुन्हा समोर आलं आहे. पुढील कारवाई दोन्ही बाजूंच्या तक्रारींवर अवलंबून राहणार असली तरी या राड्याने मतदान प्रक्रियेलाच काळा डाग लावला आहे, एवढं निश्चित.


