‘स्पेलिंग बी वर्ड बँक’ व अधिकृत लोगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते अनावरण

नाशिक : जिल्हा परिषद नाशिक व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व वाढविण्याच्या उद्देशाने सन २०२३ पासून ‘स्पेलिंग बी’ हा अभिनव उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला अधिक शैक्षणिक दिशा मिळावी तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल, या हेतूने यंदा होणाऱ्या स्पेलिंग बी स्पर्धेसाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून ‘स्पेलिंग बी वर्ड बँक’ची निर्मिती करण्यात आली आहे.
आज ‘स्पेलिंग बी वर्ड बँक’ तसेच स्पेलिंग बी स्पर्धेच्या अधिकृत लोगोचे अनावरण मा. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वर्ड बँकेत इयत्ता पहिली ते आठवीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकांमधील शब्दांचे गटनिहाय संकलन करण्यात आले असून, ही वर्ड बँक अभ्यासक्रमाशी पूर्णतः सुसंगत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पेलिंग बी स्पर्धेच्या तयारीसाठी तसेच दैनंदिन अध्ययनासाठी मोठी मदत होणार आहे.
याच कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवरे, तालुका निफाड येथील शिक्षक प्रदीप देवरे यांनी तयार केलेल्या ‘स्पेलिंग बी’ उपक्रमाच्या अधिकृत लोगोचेही अनावरण करण्यात आले.
या अनावरण सोहळ्याला शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सरोज जगताप, संतोष झोले, शिक्षण विस्तार अधिकारी तसेच पीएम श्री शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेतील शब्दसंपदा, उच्चार व आत्मविश्वास वाढण्यास निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.


