हमरस्त्यावरील वृक्षलागवडीत भ्रष्टाचाराचा आरोप?
माहिती न दिल्यास उपोषणाचा इशारा -पंचायत समिती सदस्य लक्ष्मण उर्फ प्रदीप गावडे
कणकवली (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) हमरस्त्यालगत करण्यात आलेल्या वृक्षलागवड व जाळी बसविण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप पंचायत समिती सदस्य लक्ष्मण उर्फ प्रदीप गावडे यांनी केला आहे. याबाबत लेखी तक्रार करूनही अद्याप माहिती देण्यात आलेली नसल्याने पुढील मासिक सभेत समाधानकारक माहिती न मिळाल्यास उपोषण छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
पंचायत समितीच्या मासिक सभेत पिडब्ल्यूडी अभियंत्यांना जाब विचारताना गावडे यांनी सांगितले की, हमरस्त्यालगत करण्यात आलेली वृक्षलागवड बोगस असून वृक्षांना लावण्यात आलेली जाळी केवळ जिओ टॅगिंगसाठी फोटो काढल्यानंतर काढून पुढील वृक्षाला लावण्यात आली आहे. यासंदर्भात आपल्या जवळ व्हिडिओ पुरावा असल्याचाही दावा त्यांनी केला.
तसेच, प्रत्यक्षात काम न करता किंवा अपूर्ण काम करूनही संबंधित ठेकेदाराला तब्बल १७ लाख रुपयांचे देयक अदा करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील मासिक सभेत संपूर्ण माहिती सभागृहासमोर सादर करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा गावडे यांनी दिला.


