मासळीच्या साठ्याचे संवर्धन तसेच मच्छीमारांच्या जीवित आणि वित्त संरक्षणाच्या उद्देशाने राज्य शासनाने महाराष्ट्राच्या सागरी जलक्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाच्या आदेशानुसार, दि. १ जून २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत (दोन्ही दिवस धरून) महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
या कालावधीत समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा) २०२१ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे.
त्यामुळे सर्व मच्छीमार, नौका मालक, तांडेल आणि खलाशी यांनी शासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.