२६ खाण प्रकल्पांनी, कोकण विक्रीला काढला?

0
96
२६ खाण प्रकल्पांनी, कोकण विक्रीला काढला? -
२६ खाण प्रकल्पांनी, कोकण विक्रीला काढला? -

२६ खाण प्रकल्पांनी, कोकण विक्रीला काढला? –

कोकणात जे काही घडते आहे ते अचानक नाही, अपघाती नाही आणि वेगळ्या वेगळ्या निर्णयांची बेगडी बेरीजही नाही. गेल्या काही वर्षांत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत प्रस्तावित झालेले २६ खाण प्रकल्प, त्याच परिसरांतून काढले जाणारे महामार्ग, समुद्री महामार्ग आणि रेल्वे मार्ग, तसेच वन्यजीव अधिवास नसल्याचे दाखवण्याची घाई हे सारे एकाच धोरणात्मक आराखड्याचे भाग असल्याचे आता स्पष्ट होत आहे. लोह, बॉक्साईट, ग्रॅफाइट, निकेल, क्रोमियम आणि सोन्यासारख्या मौल्यवान खनिजांच्या नावाखाली पश्चिम घाटाच्या कुशीत असलेला कोकण पद्धतशीरपणे उघड्या खाणींकडे ढकलला जात आहे. विकासाच्या घोषणांच्या आड जे लपवले जात आहे, ते म्हणजे आंबा–काजूची बाग, पाण्याचे झरे, जंगलातील हत्तीचे पाऊलखुणा आणि कोकणच्या पुढील पिढ्यांचा हक्क. प्रश्न हा विकास हवा की नको असा नाही, प्रश्न असा आहे की हा विकास नेमका कोणासाठी आणि कोणाच्या किंमतीवर?

सिंधुदूर्गजिल्हा I प्रतिनिधी 
महाराष्ट्राच्या निसर्गरम्य कोकण किनारपट्टीवर विकासाच्या नावाखाली खाणकामाचा भडका उडवण्याची तयारी केंद्र आणि राज्य सरकारने सुरू केली असून, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत तब्बल २६ खाण प्रकल्प प्रस्तावित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोहखनिज, बॉक्साईट, ग्रॅफाइट, निकेल, क्रोमियम आणि सोन्यासारख्या मौल्यवान धातूंच्या उत्खननासाठी हजारो हेक्टर क्षेत्र आरक्षित करण्यात आले असून, यामुळे पश्चिम घाटातील संवेदनशील पर्यावरण, वन्यजीव अधिवास आणि कोकणची पारंपरिक अर्थव्यवस्था गंभीर धोक्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात सासोली येथे २००० हेक्टरवर लोहखनिजाचा महाप्रकल्प प्रस्तावित असून, सावंतवाडीतील सतरडा (१२०० हेक्टर) आणि आजगाव (८४० हेक्टर) येथेही मोठ्या खाणींचे नियोजन आहे. सावंतवाडी तालुक्यातील बागवाडी आणि घनपेवाडी या गावांमध्ये सुमारे ८०५ हेक्टर क्षेत्रात सोने, निकेल आणि क्रोमियमसारख्या दुर्मिळ खनिजांचे साठे असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. कणकवलीतील बिडवाडी येथे ग्रॅफाइट, तर मालवण आणि देवगड तालुक्यांत बॉक्साईट खाणी प्रस्तावित आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुका खाणकामाचे केंद्र बनत असून, साउथ पाडवे, पलीये आणि नाणार येथे बॉक्साईट उत्खननाचे ब्लॉक्स निश्चित करण्यात आले आहेत. दापोलीतील चिखलगाव परिसरातही बॉक्साईट साठ्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे नाणार परिसर आधीच औद्योगिक प्रकल्पांमुळे वादग्रस्त असताना, आता खाणकामाचा नवा स्फोट घडवण्याची तयारी सुरू आहे.
या खाण प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर कोकणात अचानक सुरू झालेली महामार्ग, समुद्री महामार्ग आणि रेल्वे प्रकल्पांची लगबगही संशयास्पद ठरत आहे. नागपूर जोडणारा महामार्ग, तीन समुद्री महामार्ग आणि कोल्हापूर- वैभववाडी- राजापूर रेल्वे मार्गाला मिळालेली झटपट मंजुरी ही खनिज वाहतुकीसाठीच असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिक करत आहेत.
दरम्यान, वन्यजीव अधिवास पद्धतशीरपणे रिकामे करण्याचा प्रयत्न सुरू असून, इको-सेन्सिटिव्ह झोन नाहीत असे दाखवून खाणकामासाठी मोकळे रान तयार केले जात असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. हत्ती ओंकारला वनतारा येथे पाठवण्यामागील अट्टाहासही याच कटाचा भाग असल्याची चर्चा आहे. या सगळ्या प्रकरणात राजकीय नेते, वनविभागातील अधिकारी आणि मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांचे साटेलोटे असल्याचे आरोप होत असून, याची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची मागणी जोर धरत आहे.
कोकण विक्रीला काढण्याचा हा डाव वेळीच उधळून लावला नाही, तर पुढील पिढ्यांना हिरवागार कोकण फक्त इतिहासाच्या पुस्तकातच पाहायला मिळेल, असा इशारा स्थानिक नागरिक देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here