३० डिसेंबर रोजी कोल्हापुरात संत साहित्य संमेलन २०२५
कोल्हापूर l
संत साहित्याची परंपरा, वारकरी संप्रदायाचे विचार आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे योगदान अधोरेखित करणारे संत साहित्य संमेलन २०२५ मंगळवार, ३० डिसेंबर २०२५ रोजी कोल्हापूर येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात संत साहित्य, लोकसंस्कृती आणि वारकरी परंपरेवर चिंतन-मंथन होणार आहे.
संमेलनाची सुरुवात सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडीने होणार असून, यावेळी पारंपरिक वारकरी भजन, लेझीम आणि झिम्मा-फुगडी सादर केली जाणार आहे. त्यानंतर पालखी पूजन प्रा. डॉ. ज्योती जाधव (प्रभारी प्र-कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांच्या हस्ते होणार आहे.
उद्घाटन समारंभ सकाळी ११ वाजता पार पडणार असून, संमेलनाचे उद्घाटन प्रा. डॉ. सदानंद मोरे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई) यांच्या हस्ते होईल. संमेलनाध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सतीश बडवे (संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक) मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी प्रा. डॉ. सुरेश गोसावी (प्रभारी कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) अध्यक्षस्थानी असतील.
कार्यक्रमाला प्रा. डॉ. प्रमोद मुचाटे, प्रा. प्रविण बांदकर (सदस्य, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई), प्रा. डॉ. रणधीर शिंदे (प्रमुख, मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) आणि डॉ. डी. एन. शिंदे (कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
दुपारी १२.३० ते २.०० या वेळेत “वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादात श्री. ज्ञानेश्वर बंडगर, श्री. श्रीरंग गायकवाड, प्रा. डॉ. गोविंद काजरेकर, प्रा. प्रभाकर देसाई, प्रा. प्रविण बांदकर आणि प्रा. डॉ. अनिल गवळी सहभागी होणार असून, अध्यक्षस्थान प्रा. प्रमोद मुचाटे भूषवणार आहेत. दुपारी २ ते ३ या वेळेत भोजनावकाश ठेवण्यात आला आहे.
संत साहित्य, वारकरी विचारधारा आणि मराठी सांस्कृतिक परंपरेच्या अभ्यासकांसाठी हे संमेलन मार्गदर्शक ठरणार असून, साहित्यप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी आणि वारकरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


