‘धाव प्रगतीची, गतीशील ठाण्याची’चा संदेश देत हजारो ठाणेकरांचा सहभाग
ठाणे :
ठाणे शहराचा मानबिंदू ठरलेली ३२ वी ‘ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा २०२६’ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. ‘धाव प्रगतीची, गतीशील ठाण्याची’ हा संदेश देत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत असंख्य ठाणेकर तसेच विविध क्षेत्रांतील खेळाडूंनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला.
स्वर्गीय सतीश प्रधान यांच्या संकल्पनेतून ठाण्यात सुरू झालेल्या या मॅरेथॉनचे यंदाचे ३२ वे वर्ष आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळात या स्पर्धेने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडूंना आकर्षित केले आहे. आदिवासी भागातील धावपटूंनीही या स्पर्धेत सहभागी होत आपली छाप उमटवली आहे.
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की ठाणेकर या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतात. यंदाही मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेत मॅरेथॉनचा उत्साह वाढवला. बदलत्या ठाण्याचे प्रतिबिंब या स्पर्धेतून पाहायला मिळत असून, शहराच्या विकासासोबतच क्रीडा क्षेत्रातही ठाणे पुढे जात असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
माजी क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी यांनी खेळाडूंना अधिक चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत केलेल्या सूचनांची दखल घेऊन आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे यावेळी सांगण्यात आले. ठाणे शहरातून केवळ राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील नव्हे, तर ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू घडावेत, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
या मॅरेथॉनमध्ये राजकीय सहकारी आणि कलाकारांच्या साथीने स्वतःही सहभाग घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले. स्पर्धेच्या निमित्ताने ठाणे शहरातील क्रीडाप्रेमी, नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सौ. लता एकनाथ शिंदे, माजी क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी, आमदार संजय केळकर, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, गटनेते पवन कदम, विरोधी पक्षनेते अश्रफ शानु पठाण, तसेच नगरसेवक राजेश मोरे, संजय वाघुले, विकास रेपाळे, नम्रता जाधव भोसले, मीनल संख्ये, नारायण पवार, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, सुधीर कोकाटे आणि मुकेश मोकाशी यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
अभिनेता मंगेश देसाई तसेच टेलिव्हिजन मालिकांमधील अनेक अभिनेते-अभिनेत्री आणि ठाणेकर स्पर्धकांनीही या मॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेला क्रीडा आणि मनोरंजनाची रंगत लाभली.