३ किलो वजनाचा ‘शरद मॅंगो’; गोविंद बागेत लागवड, प्रयोगशील शेतकऱ्याच्या नावीन्यपूर्ण प्रयोगाचे कौतुक
३ किलो वजनाचा ‘शरद मॅंगो’; गोविंद बागेत लागवड, प्रयोगशील शेतकऱ्याच्या नावीन्यपूर्ण प्रयोगाचे कौतुक
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अरण गावचे प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय घाडगे यांनी विकसित केलेल्या ‘शरद मॅंगो’ या विशिष्ट आंब्याच्या जातीच्या रोपांची लागवड गोविंद बाग येथे करण्यात आली. या आंब्याच्या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या एका फळाचे वजन तब्बल ३ किलोपर्यंत असते.
स्थानिक हवामान आणि परिस्थितीचा अभ्यास करून नावीन्यपूर्ण प्रयोग, सातत्यपूर्ण मेहनत आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाची सांगड घालत दत्तात्रय घाडगे यांनी ‘शरद मॅंगो’ ही जात विकसित केली आहे. त्यांचा हा प्रयोग शेती क्षेत्रातील संशोधन आणि प्रयोगशीलतेचे उल्लेखनीय उदाहरण ठरत आहे.
पारंपरिक शेतीसोबत नवनवीन वाणांची लागवड आणि प्रयोग केल्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते. बदलत्या हवामान आणि कृषी क्षेत्रातील आव्हानांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रयोगशील शेतकऱ्यांचे प्रयत्न महत्त्वपूर्ण मानले जात आहेत.
‘शरद मॅंगो’च्या लागवडीमुळे आंबा उत्पादन क्षेत्रात नवीन शक्यता निर्माण होण्याची अपेक्षा असून, दत्तात्रय घाडगे यांच्या नावीन्यपूर्ण प्रयोगाचे कृषी क्षेत्रातून कौतुक होत आहे.