दापोली- रत्नागिरीमध्ये हळदीच्या कार्यक्रमात तुफान राडा झाला. डिजे (DJ) बंद करायला लावल्याच्या संशयावर वाद झाला. वाद वाढत गेला. बाचाबाची इतक्या टोकाला गेली की दोन गट भिडले. यानंतर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. चाकू, काठी, दगड, लोखंडी पाईप याच्या साहाय्यानं दोन गडात तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं. गैरसमजातून हा सगळा राडा झाल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात नवानगर इथं ही घटना घडली. रविवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास हळदीच्या कार्यक्रमात झालेल्या राड्यानं एकच गोंधळ उडाला होता. दरम्यान, आता याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून 30 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर 11 जण या राड्यात जखमी झाले आहेत.
हळदीत गैरसमजामुळे राडा
अशोक माने यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटलंय की, त्यांच्या घराशेजारी हळदीचा कार्यक्रम होता. मात्र त्याचवेळी त्यांच्या नातेवाईकांचं कोल्हापूर इथं निधान झालं होते. त्यामुळे ते कोल्हापूरला जायला निघाले. नेमक्या याच क्षणी पोलीसही आले आणि त्यांनी डिजे बंद करायला लावला. पण माने यांच्यामुळेच पोलिसांनी डिजे बंद करायला लावला, असा गैरसमज झाल्यातून हा सगळा प्रकार घडल्याची तक्रार देण्यात आली.


