‘व्हिजन दापोली’ या महत्वाकांक्षी उपक्रमाचे अनेक सकारात्मक परिणाम आता दिसू लागले असून व्हिजन दापोली पॅटर्नचे आता सर्वत्र नाव झाले आहे. दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या आठ विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झाली आहे. यावर्षी ही संख्या निश्चितपणाने आणखी वाढेल यात शंका नाही. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतही दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकणारे अनेक विद्यार्थी अधिक संख्येने चमकतील याची खात्री आहे. याचाच अर्थ असा की, दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकविणारे सर्वच शिक्षक अतिशय चांगले काम करीत आहेत. येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढली असून ती याहीपेक्षा अधिक कशी वाढेल, तालुक्यातील सर्वच विद्यार्थी गुणवत्ताधारक कसे बनतील याकडे आता प्राधान्याने लक्ष देण्यात येईल असे स्पष्ट मत दापोली पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी जि. प. शाळा मौजे दापोली येथे आयोजित केलेल्या शिक्षण परिषदेत बोलताना व्यक्त केले.
यावेळी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव पुढे म्हणाले की, पुर्वी केंद्रस्तरीय शै. संमेलन, गट संमेलन आयोजित करण्यात येत होते. मात्र आता सर्वांगीण व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विशिष्ट उद्दीष्टे डोळ्यांसमोर ठेवून शै. संमेलनाऐवजी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. शिक्षण परिषद याचा अर्थच असा आहे की, आता विद्यार्थ्यांच्या सर्वागीण व गुणवत्तापुर्ण शिक्षणासाठी आवश्यक मुद्दय़ांवर व घटकांवर या परिषदेत तज्ञ मान्यवर व्यक्तिंचे मार्गदर्शन, चर्चा व विचारमंथन होणार आहे, तसे ते होतही आहे. मात्र आता सर्वच शिक्षकांनी बदलत्या काळानुसार आपल्या अध्यापन तंत्रांमध्ये बदल करून ही तंत्रे विद्यार्थ्याभिमुख कशी होतील हे पाहणे गरजेचे आहे. राष्ट्रीय शिक्षण आराखडा- २०२० नुसार विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक सुधारणा होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रीय शिक्षण मसुद्याचे वाचन व त्याचा अभ्यास करणेही आवश्यक आहे.
दापोली तालुक्यातील गिम्हवणे केंद्राची चालू शैक्षणिक वर्षातील पहिली शिक्षण परिषद नुकतीच जि. प. आदर्श मराठी शाळा मौजे दापोली येथे पार पडली.
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी चंद्रनगर शाळेच्या मुख्याध्यापिका रीमा कोळेकर या होत्या. याशिवाय या परिषदेसाठीच्या व्यासपीठावर दापोली प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, गिम्हवणे केंद्राचे केंद्रप्रमुख प्रविण काटकर, केंद्र मुख्याध्यापक सदाशिव रसाळ, मौजे दापोली शाळेचे मुख्याध्यापक भरत गिम्हवणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पद्मन लहांगे व प्रविण काटकर यांनीही उपस्थित शिक्षकांस मार्गदर्शन केले. याशिवाय प्रिया पवार यांनी ‘ निपुण भारत अभियान ‘, अर्चना सावंत यांनी ‘ मूल शिकताना येणाऱ्या अडचणी व उपाय ‘, विनोद सुराडकर यांनी ‘ हर घर तिरंगा ‘ या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. संपूर्ण शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन महेश कोकरे यांनी केले तर भरत गिम्हवणेकर यांनी शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानले. ही शिक्षण परिषद यशस्वी होण्यासाठी मौजे दापोली शालेय व्यवस्थापन समितीने नियोजन व कार्यवाही केली होती.


