नवी दिल्ली- अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने सर्व खाद्य तेल संघटनांना खाद्यतेलाच्या कमाल किरकोळ किमतीत १५ रुपये प्रतिलीटरने तात्काळ कपात करण्याचे निर्देश दिल्याचं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने सांगितलं. उत्पादक आणि रिफायनर्सने वितरकांना दिलेली किंमत देखील ताबडतोब कमी करण्याचेही निर्देश मंत्रालयाने दिले आहेत.
उत्पादक/रिफायनर्सकडून जेव्हा जेव्हा वितरकांसाठी किंमती कमी केल्या जातात तेव्हा त्याचा फायदा उद्योगांनी ग्राहकांपर्यंत पोहोचवला पाहिजे आणि विभागाला नियमितपणे माहिती दिली जावी, यावरही विचार करण्यात आला. काही कंपन्यांनी त्यांच्या किमती कमी केल्या नाहीत आणि त्यांची एमआरपी इतर ब्रँडपेक्षा जास्त आहे त्यांनाही त्यांच्या किमती कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. खाद्य तेल संघटनांसोबत झालेल्या बैठकीत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने हे निर्देश दिले.


