मुबंई- वन्यजीवांच्या संवर्धनासाठी राज्यात १८ नवी आणि सात प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली. त्यामुळे सुमारे १३ हजार चौरस किलोमीटर क्षेत्र संरक्षित होण्यास मदत होणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेत राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. वाय एल पी राव, वन्यजीव मंडळाचे सदस्य सचिव व प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये आदी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत राज्यात १८ नवी संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्यात आली.
राष्ट्रीय उद्यानालगत आणि अभयारण्यालगत किंवा दोन संरक्षित क्षेत्र जोडणाऱ्या भूप्रदेशातील प्राणी, वनस्पती यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याच्या हेतूने संवर्धन राखीव क्षेत्र घोषित केली जातात. प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्रांमध्ये नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गड, ठाणे जिल्ह्यातील मोरोशीचा भैरवगड, औरंगाबाद जिल्ह्यातील धारेश्वर, त्रिकुटेश्वर, कन्नड, पेडकागड, तर नांदेड जिल्ह्यातील किनवटचा समावेश आहे.


