आळंदी विकासासाठी एनसीपीची घोषणा

0
103
आळंदी विकासासाठी एनसीपीची घोषणा
आळंदी विकासासाठी एनसीपीची घोषणा

आळंदी विकासासाठी एनसीपीची घोषणा


आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार प्रकाश पंढरीनाथ कुऱ्हाडे आणि सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पक्षाच्या नेतृत्वाने आळंदीच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप मांडला. वारकरी संप्रदायाचा अमूल्य वारसा लाभलेल्या आळंदी शहराला आधुनिक व सुबक सुविधा उपलब्ध करून देणे हीच पक्षाची भूमिका असल्याचे सभेत स्पष्ट करण्यात आले.

या सभेत सांगण्यात आले की, आळंदी शहरासाठी नवीन विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्याद्वारे पुढील काही वर्षांत शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या उपाययोजना अंतिम टप्प्यात असून नदीवरील पुलाचे कामही प्राधान्याने पूर्ण केले जाणार आहे. आळंदी तीर्थक्षेत्र विकासासाठी मंजूर झालेल्या २१७ कोटी रुपयांपैकी ९० कोटींची कामे सुरू आहेत. शहराला जोडणारा नवीन पूल, बाह्यवळण रस्ता आणि इतर पायाभूत प्रकल्पांना गती देण्यात आल्याची माहिती सभेत देण्यात आली.

पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी भामा-आसखेड ते आळंदी अशी ४७ कोटी रुपयांची योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. स्वच्छ आणि सुंदर आळंदीच्या उद्देशाने ठोस कचरा व्यवस्थापन तसेच मलनि:सारण योजनेसाठी सहा कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे. घाट परिसरातील पाणी स्वच्छ ठेवणे आणि वारकरी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आवश्यक कामे मार्गी लावण्यावर भर दिला जाईल. वारकरी संख्येचा विचार करता मोठे पार्किंग प्रकल्प आणि भव्य वारकरी भवन उभारण्याची आखणीही सुरू असल्याचे सांगण्यात आले.

युवकांसाठी खेळाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन क्रीडांगण उभारण्याचा संकल्प सभेत व्यक्त करण्यात आला. आळंदीच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून आवश्यक निधी आणण्याची क्षमता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असल्याचा ठाम विश्वास पक्षनेत्यांनी व्यक्त केला.

सभेच्या शेवटी नागरिकांना आवाहन करण्यात आले की, आळंदीच्या प्रगतीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना २ डिसेंबरला प्रचंड बहुमतांनी विजयी करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here