संतोष बांगर अडचणीतः सरकार दबाव आणत असल्याचा काँग्रेसचा आरोप

0
280
संतोष बांगर अडचणीतः सरकार दबाव आणत असल्याचा काँग्रेसचा आरोप
संतोष बांगर अडचणीतः सरकार दबाव आणत असल्याचा काँग्रेसचा आरोप

संतोष बांगर अडचणीतः सरकार दबाव आणत असल्याचा काँग्रेसचा आरोप

हिंगोली | प्रतिनिधी

हिंगोली नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. मतदान केंद्रावर आमदार बांगर यांनी महिला मतदाराला कोणत्या उमेदवाराला मतदान करावे हे थेट सांगितल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता आणि कायद्याची अंमलबजावणी याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मतदान केंद्रावर राजकीय नेत्यांना प्रचार किंवा प्रभाव टाकण्यास कडक मनाई असते. मात्र, या सर्व नियमांना जुमानत नाही असे वर्तन बांगर यांनी केल्याचा आरोप होत आहे.

हे पण वाचा रत्नागिरीच्या विकासातील खोळींबाबत जाधवांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

ही घटना समोर आल्यानंतर काँग्रेसने संतोष बांगर यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, मतदान केंद्रावर असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी या वर्तनावर तडक प्रतिक्रिया न देता कोणतीही आक्षेप नोंदवला नाही. त्यामुळे प्रशासनाचा निष्क्रीय कारभारही चर्चेत आला आहे.

तदान केंद्रावर थेट हस्तक्षेप?

समोर आलेल्या व्हिडिओत महिला मतदार मतपेटीकडे जात असताना आमदार संतोष बांगर तिच्याजवळ जाऊन कुठे मतदान करायचे, हे सांगताना स्पष्ट दिसत आहेत. मतदान केंद्रात प्रवेश करण्यास दिलेली परवानगी फक्त ठरावीक जबाबदार व्यक्तींनाच असते. शिवाय मतदान करताना मतदारांवर कोणतेही दबावाचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी केंद्रांवर नियम अत्यंत कडक असतात. परंतु हा नियम धाब्यावर बसवत बांगर यांनी मतदान केंद्रातच राजकीय हस्तक्षेप केल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर जनतेतही नाराजीचे वातावरण दिसून आले आहे. मतदान केंद्रांवर शिस्त आणि कायद्याचे पालन किती पाळले जाते याबाबत अनेकांना शंका वाटू लागली आहे.

घोषणाबाजीचाही व्हिडिओ चर्चेत

याच घटनेसोबत आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात आमदार बांगर मतदान केंद्राच्या आसपास कार्यकर्त्यांसह जोरदार घोषणाबाजी करताना दिसतात.

निवडणूक आयोगाने आचारसंहिते नुसार मतदान केंद्राच्या परिसरात प्रचार, घोषणाबाजी किंवा मतदारांना प्रभावित करणारी कोणतीही कृती करण्यास पूर्णपणे मनाई असते. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून याचा जाणीवपूर्वक भंग केला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. सामान्य मतदारांना जर नियमांचे पालन न केल्यास कारवाई केली जाते, तर राजकीय नेत्यांना मात्र उघड मुभा मिळते का? असा प्रश्नही मतदारांकडून उपस्थित केला जात आहे.

प्रशासनाकडून गंभीर दखल, चौकशी सुरू

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या सर्व व्हिडिओंची तपासणी करून अहवाल मागविण्यात आला आहे. पुढील चौकशीनंतर बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे प्रशासनाने सांगितले आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष राहावी यासाठी आयोगाकडून कडक नियम लागू असतात. मात्र या प्रकरणात मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी लगेच का कारवाई नाही केली? याबाबत निवडणूक यंत्रणेलाही उत्तर द्यावे लागणार आहे.

विरोधकांचा संताप- सत्तेचा गैरवापर सुरूच

या घटनेनंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी संतोष बांगर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. मतदान केंद्रावर सत्ताधाऱ्यांचा बिनधास्त वावर सुरू आहे. नियम फक्त विरोधकांसाठीच आहेत का? न्याय्य निवडणूक प्रक्रियेची पायमल्ली केली जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विरोधकांचा आरोप आहे की शिंदे-भाजप सरकार सत्ता आणि प्रशासनाचा वापर करून निवडणूक प्रक्रियेवर दबाव आणत आहे. मतदारांना धमक्या देणे, प्रभाव टाकणे आणि थेट मतदान कसे करायचे सांगणे ही लोकशाहीला धक्का देणारी उदाहरणे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, शिंदे गटाने मात्र अद्याप या वादावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु त्यांचे समर्थक हा सर्व प्रकार राजकीय नाट्य असल्याचा आरोप करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here