लोकाभिमुख राजभवनाचा नवा अध्याय
मुंबई : प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र राजभवनचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे करण्यात आले आहे. महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी याबाबत राजभवन सचिवालयाला औपचारिक निर्देश दिले असून हा बदल राजभवन अधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे.

राज्यपालांनी सांगितले की, लोककल्याणाच्या उद्देशाने राजभवनचे दरवाजे नागरिक, विद्यार्थी, संशोधक, शेतकरी आणि विविध नागरी संघटनांसाठी अधिक खुले करण्यासाठी हा निर्णय मार्गदर्शक ठरेल. राजभवन हे केवळ राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय न राहता, राज्यातील लोकांशी संवाद, सहभाग आणि सहकार्य वाढवणारे केंद्र व्हावे, हीच ‘लोकभवन’ नामांतराची भावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन नावामुळे राजभवनच्या कार्यपद्धतीत लोकसहभाग अधिक वाढेल आणि राज्यातील विविध सामाजिक घटकांशी संवादाची नवी दालने उघडतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


