ई-चलान तडजोड होणार नाही; १३ डिसेंबरच्या लोकअदालतीबाबत पोलिसांचे स्पष्ट आवाहन
येत्या १३ डिसेंबर २०२५ रोजी राज्यभर आयोजित करण्यात येणाऱ्या लोकअदालतीत ई-चलान प्रकरणांची कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे स्पष्ट परिपत्रक अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे.
हे पण वाचा भरणे येथील कोंडीचा फटका पालकमंत्र्यांनाही
सन २०२५ पासून प्रलंबित असलेल्या ई-चलान प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी वाहतूक विभागाकडून महाराष्ट्र राज्य विधी व सेवा प्राधिकरणाच्या मंजुरीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आगामी लोकअदालतीत एकही ई-चलान प्रकरण तडजोडीसाठी ठेवले जाणार नाही, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, यूट्यूब, इंस्टाग्राम तसेच इतर सामाजिक माध्यमांवर १३ डिसेंबरच्या लोकअदालतीत ई-चलान दंडात सवलत मिळणार असल्याचा खोटा प्रचार सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या अफवांमुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
ई-चलान तडजोड किंवा दंडात सवलत मिळेल, अशा सोशल मीडियावरील अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, तसेच कोणत्याही अनधिकृत लिंकद्वारे ई-चलानचा भरणा करू नये, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
जर एखाद्या नागरिकाचे प्रकरण स्थानिक जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाने तडजोडीसाठी ठेवले असेल, तर संबंधित न्यायालय किंवा स्थानिक वाहतूक पोलीस ठाण्याशी थेट संपर्क साधावा, असे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक (मुख्यालय) सुनील भारव्दाज यांनी अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाच्या वतीने केले आहे.


