भरणे येथील कोंडीचा फटका पालकमंत्र्यांनाही

0
173
पुणे डीपी, भिवंडी डम्पिंग ग्राउंड आणि मुंबईतील भोगवटा निर्णयावर मंत्री सामंतांची माहिती
पुणे डीपी, भिवंडी डम्पिंग ग्राउंड आणि मुंबईतील भोगवटा निर्णयावर मंत्री सामंतांची माहिती

भरणे येथील कोंडीचा फटका पालकमंत्र्यांनाही

रत्नागिरी | प्रतिनिधी

पालकमंत्री उदय सामंत हे शुक्रवारी सकाळी भरणे येथून खेडच्या दिशेने प्रवास करत असताना त्यांच्या ताफ्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मंत्र्यांचा दौरा असल्यास ताफा विनाअडथळा मार्गस्थ व्हावा यासाठी विशेष व्यवस्था केली जाते; मात्र या वेळी अशी कोणतीही प्रभावी व्यवस्थाच नसल्याचे दिसून आले.

खेड–भरणे राज्य महामार्गावर सध्या रस्त्याचे काम सुरू असून भरणे परिसरात खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे एकाच मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू असल्याने गेल्या काही दिवसांपासून येथे वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र झाली आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, शिवसेना उपनेते संजय कदम यांच्या अभिष्टचिंतनासाठी उदय सामंत खेडच्या दिशेने जात असताना त्यांचा ताफा या कोंडीत अडकला. ताफ्यातील पोलीस यंत्रणांची परिस्थिती हाताळताना चांगलीच धावपळ झाली. एसटी बसेसही या कोंडीत अडकल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या.

या घटनेमुळे भरणे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न किती गंभीर आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून रस्ते कामाची गती वाढवून तातडीने वाहतूक सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here