रत्नागिरीत सराईत तीन गुन्हेगारांना दोन वर्षांची  हद्दपारीची  शिक्षा

0
131
रत्नागिरीत सराईत तीन गुन्हेगारांना दोन वर्षांची  हद्दपारीची  शिक्षा
रत्नागिरीत सराईत तीन गुन्हेगारांना दोन वर्षांची  हद्दपारीची  शिक्षा

रत्नागिरीत सराईत तीन गुन्हेगारांना दोन वर्षांची  हद्दपारीची  शिक्षा

रत्नागिरी l प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली असून रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीतील दोन सराईत गुन्हेगारांना चार जिल्ह्यांतून, तर लांजा पोलीस ठाणे हद्दीतील एका गुन्हेगाराला रत्नागिरी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांविरोधात ठोस आणि परिणामकारक कारवाईचे निर्देश देण्यात आले होते.

त्यानुसार रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीतील सलमान उर्फ आकाश अशोक डांगे आणि आमिर नजिर मुजावर यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली.सलमान उर्फ आकाश डांगे (रा. साईश्वरी अपार्टमेंट वॉचमन रूम, थिबा पॅलेस, माळनाका, रत्नागिरी) याच्यावर शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे तसेच अमली पदार्थ विक्रीसंबंधी गुन्हे दाखल आहेत. त्याच्या कारवायांमुळे शहरातील तरुण पिढी अमली पदार्थांच्या आहारी जात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. तर आमिर नजिर मुजावर (रा. घर नं. १३८५, राजीवडा नाका, रत्नागिरी) याच्यावर शरीराविरुद्ध व महिलांविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.

या दोघांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण झाला होता.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ५६ (१)(अ) अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर व पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी यांनी सलमान उर्फ आकाश डांगे आणि आमिर नजिर मुजावर यांना रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, रायगड आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान, लांजा पोलीस ठाणे हद्दीतील शिपोशी हनुमानवाडी येथील सराईत गुन्हेगार गुरुनाथ यशवंत तावडे (रा. शिपोशी, हनुमानवाडी, ता. लांजा) याच्यावरही कडक कारवाई करण्यात आली आहे. तावडे याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ तसेच भारतीय दंड विधान संहिता कलम ४५७ व ३८० अन्वये गंभीर गुन्हे दाखल आहेत.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलीस ठाण्याचे निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, राजापूर यांनी गुरुनाथ यशवंत तावडे याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१)(अ) अन्वये रत्नागिरी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.या कारवाईमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here