कोकणातील बागा वाचवण्यासाठी केंद्र सरकारचे युद्धपातळीवर उपाय

0
108
कोकणातील बागा वाचवण्यासाठी केंद्र सरकारचे युद्धपातळीवर उपाय
कोकणातील बागा वाचवण्यासाठी केंद्र सरकारचे युद्धपातळीवर उपाय

कोकणातील बागा वाचवण्यासाठी केंद्र सरकारचे युद्धपातळीवर उपाय

कोकणातील नारळ उत्पादन सध्या गंभीर संकटात सापडले असताना केंद्र सरकारने या महत्त्वाच्या पिकाच्या संरक्षणासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लोकसभेत माहिती देताना सांगितले की, नारळ बागांवर हल्ला करणाऱ्या घातक किडी व रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वच्छ नारळ रोप कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर विस्तारण्यात येणार आहे. हा निर्णय रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यांसारख्या कोकणातील नारळ उत्पादक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

भारत हा जगातील सर्वाधिक नारळ उत्पादन करणारा देश असून, दक्षिण भारतातून सुरू झालेल्या किडी व रोगांचा प्रादुर्भाव आता कोकण पट्ट्यातही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना चौहान यांनी स्पष्ट केले की, राइनोसेरॉस बीटल (गेडा), रेड पाम विहेल (लाल खजूर अळी), रूट विल्ट आणि गॅनोडर्मा यांसारख्या रोगांमुळे नारळ बागांचे मोठे नुकसान होत आहे.

या समस्येवर मात करण्यासाठी सरकार सर्व संबंधित यंत्रणांच्या मदतीने तातडीची आणि प्रभावी कारवाई करत असल्याचे त्यांनी सांगितले. नारळ विकास मंडळामार्फत स्वच्छ व रोगमुक्त नारळ रोपे तयार करण्याचे काम सुरू असले तरी सध्या त्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे हा कार्यक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवून शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात दर्जेदार रोपे उपलब्ध करून दिली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोकण पट्ट्यातील रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे १.५ लाख हेक्टर क्षेत्रावर नारळ बागा असून त्या जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जातात. मात्र, येथेही राइनोसेरॉस बीटल, रेड पाम विहेल, लीफ इटिंग कॅटरपिलर (पान खाणारी अळी), एरियोफिड माईट, व्हाईट ग्रब यांसारख्या किडींसह स्टेम ब्लीडिंगसारखे रोग मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत.

कोकण कृषी विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ बागांमध्ये या किडींचा व रोगांचा सरासरी प्रादुर्भाव २० ते ३० टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, पाण्याची टंचाई असलेल्या भागांत हा धोका अधिक तीव्र असल्याचे निष्पन्न झाले आहे. केंद्र सरकारच्या नव्या उपाययोजनांमुळे नारळ उत्पादनाचे संरक्षण होऊन कोकणातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here