दि. बा. पाटील नामकरण आंदोलनाला मराठा समाजाचा पाठिंबा
२२ डिसेंबरला नवी मुंबईत भव्य आंदोलन
नवी मुंबई l
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्या नेतृत्वाखाली २२ डिसेंबर रोजी भव्य आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या ऐतिहासिक आंदोलनाला आता मराठा समाजानेही आपला ठाम पाठिंबा जाहीर केला आहे.
खासदार सुरेश म्हात्रे यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन आंदोलनाची पार्श्वभूमी व भूमिपुत्रांच्या हक्कांची भूमिका सविस्तर मांडली. भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या या लढ्याला मनोज जरांगे पाटील यांनी सकारात्मक पाठिंबा दर्शविला आहे.
भूमी संपादनापासून ते नवी मुंबईच्या उभारणीपर्यंत लोकनेते दि. बा. पाटील यांचे योगदान अतुलनीय असून, त्यांच्या नावाने विमानतळाचे नामकरण व्हावे, ही कोकणवासीयांची जुनी व रास्त मागणी आहे. मराठा समाजाच्या पाठिंब्यामुळे या आंदोलनाला अधिक बळ मिळाले असून, २२ डिसेंबरच्या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


