टॅक्सी–कॅबमधील पॅनिक बटण कार्यरत ठेवण्याचे निर्देश
६.३० लाख SOS अलर्ट्सना तात्काळ प्रतिसाद
mumbai pratinidhi
सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या टॅक्सी व अॅप-आधारित कॅबमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच आपत्कालीन मदतीसाठी पॅनिक बटण असणे बंधनकारक आहे. मात्र अनेक वाहनांमध्ये हे पॅनिक बटण कार्यरत नसल्याचे प्रकार समोर आल्याने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या बाबीची गंभीर दखल घेतली होती.
महिलांना मदत मिळण्याचा कालावधी, पॅनिक बटणाची कार्यपद्धती तसेच त्यासाठी उपलब्ध मनुष्यबळ यांचा सविस्तर आढावा घेऊन परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिवहन आयुक्तांना अहवाल सादर करावा, असे निर्देश आयोगाने दिले होते.
आयोगास सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरण करताना तसेच वेळोवेळी रॅपिड अॅक्शन टीमद्वारे टॅक्सी व कॅबमधील पॅनिक बटण कार्यरत आहे की नाही, याची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे.
वायुवेग पथकाद्वारे एकूण १,०८५ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, ज्या वाहनांमध्ये त्रुटी आढळून आल्या, त्यांच्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटरकडे पॅनिक बटणाद्वारे प्राप्त झालेल्या ६,३०,२५९ SOS अलर्ट्सना तात्काळ प्रतिसाद देण्यात आला आहे. संबंधित पोलीस यंत्रणेशी समन्वय साधत आवश्यक ती त्वरित कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
सार्वजनिक वाहतूक तसेच अॅप-आधारित कॅब व टॅक्सीद्वारे प्रवास करताना महिला प्रवाशांनी वाहनात पॅनिक बटण उपलब्ध आणि कार्यरत आहे याची खात्री करून घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत तत्पर मदतीसाठी ही यंत्रणा उपयुक्त असल्याचे लक्षात ठेवून सुरक्षित व निर्भय प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे


