सावंतवाडीत पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी
सावंतवाडी प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात अंगणवाडीत शिकणाऱ्या पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीला आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला २१ तारखेपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान या अमानुष घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करत सावंतवाडी पोलिसांना निवेदन दिले आहेया घटनेत संबंधित आरोपीने अंगणवाडी परिसरात कोणीही नसल्याची संधी साधत चिमुकलीला स्वच्छतागृहात नेऊन अत्याचार केला होता. हा प्रकार घडून दोन दिवस उलटल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर वैद्यकीय तपासणीत अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी काल उशिरा पोलिसांनी संबंधित संशयिताला ताब्यात घेतले. सदर आरोपी हा किनारपट्टी भागातील एका गावचा रहिवासी असून तो आपल्या मामाच्या गावाला आला असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. आरोपी दारूच्या आहारी गेलेला असून त्याच्या पत्नीने यापूर्वीच त्याला सोडले असल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
आज त्याला सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने पोलिसांना पुढील तपासासाठी तीन दिवसांची कोठडी मंजूर केली. या पार्श्वभूमीवर संबंधित गावात तीव्र संतापाची लाट उसळली असून “अशा नराधमाला कोणतीही सवलत देऊ नये, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी,” अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.


