बालकांच्या संरक्षणासाठी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी गरजेची – जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे
चिपळूण l
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरक्षित व पोषक वातावरण आवश्यक असून, लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ (POCSO) प्रभावीपणे राबविणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी केले. चिपळूण येथील युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालसंरक्षण कायदेविषयक शिबिरात त्या बोलत होत्या.
डॉ. नेवसे यांनी वाढत्या लैंगिक अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर पालक, शिक्षक व सर्व यंत्रणांनी अधिक जागरूक राहण्याचे आवाहन केले. POCSO कायद्यात पीडित बालकाची ओळख गोपनीय ठेवणे, महिला पोलिसांमार्फत तक्रार नोंदवणे व गंभीर गुन्ह्यांसाठी जन्मठेप अथवा फाशीची तरतूद असल्याची माहिती त्यांनी दिली. आजचे बालक उद्याचे नागरिक असल्याने शाळा व कुटुंबाच्या माध्यमातून योग्य संस्कार आणि संरक्षण देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


