फोंडाघाटचा श्वास कापला जातोय का?

0
96
फोंडाघाटचा श्वास कापला जातोय का? शेकडो वर्षांचा ‘किरमँगो’ वारसा विकासाच्या करवतीखाली!
फोंडाघाटचा श्वास कापला जातोय का? शेकडो वर्षांचा ‘किरमँगो’ वारसा विकासाच्या करवतीखाली!

फोंडाघाटचा श्वास कापला जातोय का?

शेकडो वर्षांचा ‘किरमँगो’ वारसा विकासाच्या करवतीखाली!

विकासाच्या नावाखाली कुऱ्हाड चालतेय ती रस्त्यावर नाही, तर फोंडाघाटच्या स्मृतींवर! शेकडो वर्षांचा इतिहास, पिढ्यान्-पिढ्यांचा श्वास आणि निसर्गाशी असलेलं अतूट नातं जपणारा ‘किरमँगो’ आज बुलडोझर-कुऱ्हाडीसमोर असहाय उभा आहे. ज्याच्या सावलीत पिढ्या वाढल्या, खेळल्या, जगल्या; तो वारसा वृक्ष कापताना ना कायद्याची भीती, ना प्रशासनाची संवेदना, ना लोकप्रतिनिधींची जबाबदारी दिसते. विकास हवा, पण निसर्गाच्या प्राणांची किंमत मोजून? फोंडाघाट आज हाच प्रश्न आक्रोशाने विचारतोय.

फोंडाघाट | प्रतिनिधी

फोंडाघाटच्या इतिहासाचा, आठवणींचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा साक्षीदार असलेला शेकडो वर्षांचा जुना-जाणता ‘किरमँगो’ अर्थात किऱ्याचा आंबा आज विकासाच्या नावाखाली तोडला जाण्याच्या मार्गावर उभा आहे. हवेलीनगर येथील हा भला मोठा वृक्ष केवळ एक झाड नसून, फोंडाघाटच्या कित्येक पिढ्यांचा श्वास, आठवणी आणि ओळख आहे. मात्र रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली चाललेल्या बेदरकार कारवाईत हा निसर्गवारसा ‘शहीद’ होणार असल्याची माहिती समोर येताच ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.

या किरमँगो वृक्षासमोरील पटांगण आज ‘किरमँगो स्टेडियम’ म्हणून ओळखले जाते. गेल्या दोन-तीन पिढ्यांतील असंख्य खेळाडूंच्या खेळण्याचा, जिंकण्याचा-हरण्याचा साक्षीदार हा वृक्ष राहिला आहे. उन्हात सावली देणारा, पावसात आधार देणारा आणि शेकडो पक्षी-पशु, पाथेयांना आश्रय देणारा हा वृक्ष म्हणजे जिवंत निसर्गशाळाच. तरीही भांडवली विकासाच्या करवतीने आणि कुऱ्हाडीने हा इतिहास पुसला जाण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्र झाड संरक्षण व जतन कायदा २०२१ नुसार ५० वर्षांहून अधिक वय असलेल्या झाडांना वारसा वृक्ष म्हणून दर्जा देण्यात आला आहे. अशा झाडांची तोड करणे हा गंभीर गुन्हा असून त्यासाठी कडक दंडात्मक व कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. मग प्रश्न असा आहे की, फोंडाघाटमध्ये हा कायदा कुणासाठी लागू नाही का? निखिल कन्स्ट्रक्शनच्या लगत सुरू असलेल्या कामात ठेकेदार सरसकट झाडांची कत्तल करत असताना प्रशासन, वनविभाग आणि लोकप्रतिनिधी कुठे आहेत?
नांदगाव ते फोंडा तिठा ते घाट रस्त्याच्या कडेला असलेली शेकडो वर्षांपूर्वीची वड, पिंपळ, आंबा यांसारखी मोठमोठी रानझाडे आधीच तोडून टाकण्यात आली आहेत. कापलेली झाडे, फांद्या लगतच्या कब्जेदारांच्या जागेत टाकल्या जात असून त्याचा आर्थिक व मानसिक त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे. विकासाच्या नावाखाली हा विध्वंस चालू असताना, कोणतीही संवेदनशीलता, कोणतेही नियोजन आणि कोणतीही जबाबदारी दिसून येत नाही.
गेल्या वर्षी सुमारे १ कोटी ७७ लाख रुपयांच्या गटार, पादचारी पथ यांसारख्या विकासकामांनंतर, यंदा देवगड ते हैदराबाद महामार्गाच्या हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा पहिला टप्पा फोंडाघाटमध्ये सुरू आहे. विकासाची अपेक्षा असलेल्या फोंडावासियांनी सुरुवातीला या प्रकल्पाचे स्वागत केले होते. मात्र प्रत्यक्षात काम सुरू होताच निसर्गाचा असा बेमालूम संहार पाहून ग्रामस्थ उद्विग्न झाले आहेत. “निसर्ग भकास करून केलेला विकास आम्हाला नको,” अशी भावना आता उघडपणे व्यक्त होत आहे.
आरोप अधिक गंभीर आहेत. रस्त्यालगतची झाडे तोडणारे पोटकॉन्ट्रॅक्टर कापलेली लाकडे कसायाप्रमाणे विकून मलीदा लाटत असल्याचे चित्र उघडपणे दिसत आहे. तोडलेल्या लाकडांचे गोडाऊन, टेंडर, परवानग्या याबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर दिले जात नाही. ‘हम करे सो कायदा’ या मानसिकतेतून, कुणाच्या तरी वरदहस्ताने फोंडाघाटचा निसर्ग बोडखा केला जातोय का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
आज प्रश्न केवळ एका झाडाचा नाही. प्रश्न आहे फोंडाघाटच्या ओळखीचा, इतिहासाचा आणि भविष्यातील पर्यावरणाचा. विकास हवा, पण निसर्गाच्या मृत्यूच्या बदल्यात नाही. या प्रकरणात वरिष्ठ पातळीवरून तातडीने हस्तक्षेप होणे, संबंधित ठेकेदाराची चौकशी होणे आणि वारसा वृक्षाचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. अन्यथा उद्या फोंडाघाटच्या नकाशावर विकास असेल, पण फोंडाघाटची आत्मा हरवलेली असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here