वेंगुर्ले नगरपंचायत निवडणूकीची उद्या चार फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी
वेंगुर्ले
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी उद्या २१ डिसेंबरला सकाळी १० वाजल्या पासून तहसील कार्यालय येथे होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असून एकूण चार फेऱ्यांमध्ये संपूर्ण निवडणूक निकाल जाहीर होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार वेंगुर्ले नगरपरिषदेसाठी २ डिसेंबर ला मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आता २१ डिसेंबरला झालेल्या मतदानाची प्रत्यक्ष मतमोजणी होणार आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या नियोजनानुसार, ही मतमोजणी एकूण ४ फेऱ्यांमध्ये घेतली जाणार आहे. वेंगुर्ले शहरात एकूण १० प्रभागांसाठी १६ मतदान केंद्र ठेवण्यात आली होती. त्यामुळे वेंगुर्ले तहसील कार्यालयात मतमोजणीसाठी एकूण चार टेबल बसविण्यात आले आहेत. एकावेळी चार केंद्रांवरील मतमोजणी जाहीर केली जाणार आहे. अशा चार फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल. प्रभाग निहाय त्या त्या प्रभागातील नगरसेवक पदाच्या उमेदवारांची मत जाहीर करून त्यातील विजयी उमेदवाराचे नाव त्याचवेळी घोषित केले जाणार आहे. चारही फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची प्रत्येकी मते जाहीर करून त्यातील विजयी उमेदवाराचे नाव घोषित केले जाणार आहे.
या मतमोजणी प्रक्रियेची तयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे. मतदानानंतर मध्ये पंधरा दिवसांचा काळ लोटला आहे. आता मतमोजणीला केवळ एक दिवस शिल्लक असल्याने पुन्हा एकदा निवडणुकीच्या गप्पा शहरात रंगू लागल्या आहेत.


