नाशिक–पुणे रेल्वे सरळ मार्गानेच व्हावा
सर्वपक्षीय बैठक, जनआंदोलनाची पुढील दिशा ठरली
नाशिक–पुणे रेल्वे हा प्रकल्प नाशिक–सिन्नर–संगमनेर–अकोले–नारायणगाव–राजगुरुनगर–चाकण या पूर्वनियोजित सरळ मार्गानेच व्हावा, अशी ठाम मागणी करत या मार्गावरील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व रेल्वे कृती समितीच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली.
नाशिक–शिर्डी व अहिल्यानगर–पुणे रेल्वे प्रकल्पांना पाठिंबा दर्शवत, मात्र नाशिक–पुणे रेल्वे हा औद्योगिक विकास, शेतकरी, विद्यार्थी व नोकरदारांच्या हितासाठी सरळ मार्गानेच आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या प्रकल्पासाठी सुमारे १००० कोटी रुपये खर्च व जमीन अधिग्रहण झालेले असताना माघार न घेता काम पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला.
आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शिष्टमंडळाला भेट देण्याचे आश्वासन दिले आहे.
या बैठकीला ऑनलाईन माध्यमातून खासदार, आमदार व विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


