कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची नवी कार्यकारिणी बिनविरोध; वार्षिक सभा उत्साहात संपन्न
चौके (प्रतिनिधी) : योगात्मा डॉ. काकासाहेब वराडकर स्थापित कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची सन २०२४-२५ ची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, संयुक्त कट्टा येथील गुरुदक्षिणा सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संस्थेचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली.
सिंधुदुर्गातील उपक्रमशील वराडकर हायस्कूलच्या शतकमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सभेत संस्थेच्या २०२५-२६ ते २०२७-२८ या कालावधीसाठी नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत काम करण्यासाठी प्राप्त झालेल्या सर्व पंधरा अर्जांचा विचार करून सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
संस्थेचे विश्वस्त निवृत्त कर्नल शिवानंद वराडकर व ॲड. एस. एस. पवार यांनी प्रथेनुसार नवी कार्यकारिणी जाहीर केली. त्यानुसार अजयराज शरद वराडकर यांची अध्यक्षपदी, आनंद मधुकर वराडकर व शेखर सदानंद पेणकर यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. सुनील बंधुकांत नाईक व विजयश्री श्रीकांत देसाई यांची सचिवपदी, साबाजी देविदास गावडे यांची सहसचिवपदी, तर रविंद्रनाथ बाळकृष्ण पावसकर यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.
कार्यकारिणीतील संचालक म्हणून सुधीर चंद्रकांत वराडकर, महेश दिगंबर वाईरकर, श्रुती शिवानंद वराडकर, स्वाती सुधीर वराडकर, आनंद रमेश टेमकर व नितीन शशिकांत गिरकर यांची एकमताने अविरोध निवड करण्यात आली.
यासोबतच संस्थेच्या सन्माननीय सल्लागारपदी माजी विद्यार्थी व उद्योजक नारायण पेणकर, अर्थतज्ज्ञ सुहास वराडकर, उद्योजक संतोष साटविलकर आणि उद्योजक व्हिक्टर डॉन्टस यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
सभेच्या शेवटी संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विकासात्मक उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. नवी कार्यकारिणी संस्थेच्या उज्ज्वल परंपरेला पुढे नेईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला


