मांगेली ग्रामपंचायत सदस्य सुनिल गवस यांचे बेमुदत उपोषण सुरू
दोडामार्ग l
मांगेली गावात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या निष्काळजीपणामुळे ग्रामस्थांचे हाल वाढले असून रस्त्याचे काम रखडले आहे. या निषेधार्थ मांगेली ग्रामपंचायत सदस्य सुनिल गवस यांनी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.
मांगेली हा घाटरस्त्याचा भाग असल्याने दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळणे, रस्ते बंद होणे अशा आपत्कालीन परिस्थितींना ग्रामस्थांना सामोरे जावे लागते. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका शाळकरी विद्यार्थी, नोकरीसाठी बाहेरगावी जाणारा युवक वर्ग तसेच रुग्णांना बसत आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांतून खोक्रल धार ते मांगेली सातेरी मंदिरापर्यंत सुमारे ६.५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आणि कामाला सुरुवात झाली.
मात्र देऊळवाडी ते कुसगेवाडी दरम्यानचा सुस्थितीत असलेला सुमारे ३ किलोमीटरचा रस्ता ठेकेदाराने खोदून ठेवल्याने तो वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक झाला आहे. या मार्गावर आतापर्यंत अनेक अपघात घडले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे. मात्र परिस्थिती अशीच राहिल्यास भविष्यात गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी तीव्र चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे


