रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळा
ठाकरे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांसह सहा जणांवर गुन्हा दाखल
दोडामार्ग – दोडामार्ग ते विजघर राज्यमार्गावरील मुळस–खराडी ब्रिज परिसरात १८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेप्रकरणी रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर अनंता गुजर (वय ३८, मूळ रा. भोंदवडे, ता. जि. सातारा; सध्या रा. साटेली भेडशी, ता. दोडामार्ग) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी ज्ञानेश्वर गुजर हे त्यांच्या कंपनीमार्फत सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाच्या ठिकाणी उपस्थित असताना संशयितांनी कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीनुसार संशयितांनी फिर्यादीचा मोबाईल फोन फोडून नुकसान केले, तसेच हाताच्या थापटाने मारहाण करत शिवीगाळ केली. याशिवाय गाड्या फोडून आग लावण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
या तक्रारीच्या आधारे ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे, संदेश राणे, संतोष मोर्ये, विजय जाधव आणि मिलिंद नाईक यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३२४(२), ३५२, ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत करत आहेत. दरम्यान, रस्ता कामातील कथित अनागोंदी कारभाराबाबत जाब विचारणाऱ्या ठाकरे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांवरच गुन्हा दाखल झाल्याने दोडामार्ग तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून या कारवाईवरून राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.


