यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२५ साठी अर्ज पाठविण्याचे आवाहन
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीतील प्रकाशित प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र असून १ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे पुस्तके पाठविण्याचे आवाहन मंडळाच्या सचिवांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
मंडळाच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता इतर ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात तर ‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कारा’ साठी महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली येथे प्रवेशिका पाठविता येणार असून प्रवेशिका विनामूल्य उपलब्ध आहेत. लेखक आणि प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवू शकतात.
महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या सदरात ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार नियमावली व प्रवेशिका’ या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in/ या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियम पुस्तिका उपलब्ध आहे.
यासह या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभा देवी, मुंबई – ४०००२५ यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच, बृहन्महाराष्ट्रातील लेखक व प्रकाशकांसाठी महाराष्ट्र परिचय केंद्र, ए/८, स्टेट एम्पोरिया बिल्डींग, बाबा खडक सिंह मार्ग, नवी दिल्ली या कार्यालयातही स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका उपलब्ध आहे.


