रत्नागिरीत ९५ ग्रामपंचायतींमध्ये मिशन बंधारे मोहीम; एकाच दिवशी ५००हून अधिक बंधारे उभारणार
रत्नागिरी l
रत्नागिरी जिल्ह्यात जलसंधारणाला चालना देण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून मिशन बंधारे उपक्रमांतर्गत तालुकास्तरावर एकाच दिवशी भव्य मोहीम राबविण्यात येणार आहे. मंगळवार, दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी जिल्ह्यातील ९५ ग्रामपंचायतींमध्ये ही मोहीम एकाच वेळी राबविली जाणार असून, यामध्ये ५०० पेक्षा अधिक बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या मोहिमेत विजय बंधारे, वनराई बंधारे तसेच कच्चे बंधारे बांधण्यात येणार असून, पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढवणे आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मिशन बंधारे मोहिमेत सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन गट विकास अधिकारी चेतन शेळके यांनी केले आहे.
या मोहिमेच्या नियोजनासाठी पंचायत समिती स्तरावर नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत एकाच दिवशी ५००हून अधिक बंधारे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी सविस्तर कार्ययोजना तयार करण्यात आली आहे.
मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत पातळीवर जिल्हा परिषद गटनिहाय संपर्क अधिकारी तसेच पंचायत समितीनिहाय ग्रामपंचायत संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांमध्ये गट विकास अधिकारी, पंचायत समितीचे तालुकास्तरीय अधिकारी यांच्यासह विस्तार अधिकारी (कृषी, ग्रामपंचायत, सांख्यिकी, शिक्षण), केंद्रप्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य पर्यवेक्षक, पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक तसेच तालुका अभियान व्यवस्थापक (एमएसआरएलएम) यांचा समावेश करण्यात आला आहे.
ही मोहीम श्रमदान व लोकसहभागातून राबविण्यात येणार असून, ग्रामपंचायत स्तरावरील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, उमेद समूहातील महिला बचतगट, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या उपक्रमामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना गती मिळून ग्रामीण भागातील पाणीटंचाईच्या समस्येवर प्रभावी उपाय होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


