राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत वैदेही पाताडे प्रथम
कणकवली (प्रतिनिधी) : २४ डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक पंचायत महाराष्ट्र – कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा कणकवली यांच्या वतीने तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत माध्यमिक गटात (इयत्ता ८ वी ते १० वी) कासार्डे माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी वैदेही पाताडे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
माध्यमिक गटासाठी “ग्राहक शिक्षण – काळाची गरज व ग्राहक जागृतीचे नवे शिल्पकार” हा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक विद्यामंदिर प्रशाला, कणकवली येथील श्रेया प्रवीण कदम हिने मिळवला. तर तृतीय क्रमांक एस. एम. हायस्कूलची आर्या सुनील पावले व माध्यमिक विद्यामंदिर, कनेडी येथील संकल्प नरेंद्र चिंदरकर यांनी संयुक्तपणे मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी माध्यमिक विद्यालय, बिडवाडी येथील सीमा किशोर चव्हाण व सरस्वती हायस्कूल, नांदगाव येथील यशश्री मेस्त्री यांची निवड करण्यात आली आहे.
या सर्व विजयी स्पर्धकांचा गौरव बुधवार, दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हा मुख्यालय ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. तृप्ती थोडमिसे (जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग) भूषविणार असून, मोहन दहीकर (जिल्हा पोलीस अधीक्षक), रविंद्र खेबुडकर (मुख्य कार्यकारी अधिकारी), शुभांगी साठे (अपर जिल्हाधिकारी) व इंदुमती मालुष्टे (अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, सिंधुदुर्ग) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. तरी सर्व विजयी स्पर्धकांनी वेळेत उपस्थित राहून कार्यक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र कणकवली तालुका शाखेच्या तालुकाध्यक्षा श्रद्धा कदम, उपाध्यक्षा गीतांजली कामत, संघटक जनार्दन शेळके, सचिव पूजा सावंत व सहसचिव विनायक पाताडे यांनी केले आहे.


