संत तुकाराम महाराजांच्या नावावरील जमीन बिल्डरला विकण्याचा प्रकार दुर्दैवी – आमदार रोहित पवार
पुणे : महाराष्ट्राच्या संतपरंपरेतूनच छत्रपती शिवाजी महाराज घडले, स्वराज्य निर्माण झाले आणि अनेक महामानव या भूमीत जन्माला आले. म्हणूनच ‘महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले’ असे म्हटले जाते, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.
या संतांचे विचार पुढे नेण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येकाची असताना, पुण्यातील लोहगाव येथे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या नावावर असलेली सुमारे दोन एकर जमीन मलिद्यासाठी बिल्डरला विकण्यात आल्याचा प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, या जमिनीची देखभाल करणाऱ्या स्पेशल पंच कमिटीनेच हा प्रकार केल्याचा आरोप त्यांनी केला.
या प्रकरणात दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. अशा नाठाळ प्रवृत्तींच्या माथी कायद्याची काठी बसली पाहिजे आणि संतांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.


