- पुण्याच्या प्रा. जयंत नारळीकरांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’, CSIR अरोमा मिशन टीमचा सन्मान
नवी दिल्ली : भारतातील विज्ञान, संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत केंद्र सरकारकडून देण्यात येणारे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार २०२५ जाहीर करण्यात आले. २३ डिसेंबर रोजी राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात विविध वैज्ञानिकांना व संशोधन पथकांना या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
या वर्षीचा सर्वोच्च ‘विज्ञान रत्न’ पुरस्कार भौतिकशास्त्र क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ, पुण्यातील इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA) चे संस्थापक कै. प्रा. जयंत विष्णू नारळीकर यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. भारतीय विज्ञानाच्या जागतिक ओळखीमध्ये त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाची ही पावती मानली जात आहे.
दरम्यान, ‘विज्ञान श्री’ पुरस्काराने कृषी विज्ञान, अणुऊर्जा, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी, पर्यावरण, गणित, संगणक विज्ञान, अवकाश विज्ञान आदी विविध क्षेत्रांतील अग्रगण्य शास्त्रज्ञांचा गौरव करण्यात आला. यामध्ये डॉ. ज्ञानेंद्र प्रताप सिंह (कृषी विज्ञान), डॉ. युसुफ मोहम्मद शेख (अणुऊर्जा), डॉ. कुमारस्वामी थंगराज (जीवशास्त्र), प्रा. थलप्पील प्रदीप (रसायनशास्त्र), प्रा. अनिरुद्ध भालचंद्र पंडित (अभियांत्रिकी), डॉ. एस. वेंकट मोहन (पर्यावरण विज्ञान), प्रा. महान एम. जे. (गणित व संगणक विज्ञान) तसेच इस्रोचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयन एन. यांचा समावेश आहे.
तरुण संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘विज्ञान युवा–एसएसबी’ पुरस्कारांद्वारे देशभरातील उदयोन्मुख शास्त्रज्ञांना सन्मानित करण्यात आले. कृषी, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, वैद्यक, अवकाश विज्ञान, तंत्रज्ञान व नवोन्मेष या क्षेत्रांतील संशोधकांचा यामध्ये समावेश आहे. पुण्यातील IUCAA चे प्रा. सुरुद श्रीकांत मोरे, IIT कानपूरचे प्रा. अमित कुमार अग्रवाल, IIT मद्रासच्या प्रा. श्वेता प्रेम अग्रवाल यांच्यासह अनेक तरुण वैज्ञानिकांना हा सन्मान मिळाला आहे.
या पुरस्कार सोहळ्यात विशेष लक्ष वेधून घेतले ते ‘विज्ञान टीम’ पुरस्काराचे. कृषी विज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी CSIR च्या ‘अरोमा मिशन’ पथकाला हा सन्मान प्रदान करण्यात आला. सुगंधी व औषधी पिकांच्या लागवडीद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती करणे आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने भरीव योगदान देणे, या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.
Team–Aroma Mission CSIR मध्ये डॉ. प्रभोद के. त्रिवेदी, डॉ. अनिल कुमार त्रिपाठी, डॉ. आलोक कलरा, डॉ. राम विश्वकर्मा, डॉ. डी. एस. रेड्डी, डॉ. सुधेश यादव, डॉ. जबीर अहमद, डॉ. अजित कुमार शासनी, डॉ. सौदान सिंह, डॉ. संजय कुमार, डॉ. मनोज सेमवाल, डॉ. सुपला गुप्ता, डॉ. मोहन लाल, डॉ. सानत सुजात, डॉ. एस. के. तिवारी, डॉ. रमेश श्रीवास्तव, डॉ. राजेश के. वर्मा, डॉ. सुदीप टंडन, डॉ. व्ही. सुंदरशन, डॉ. राम सुरेश, डॉ. सी. गुप्ता, डॉ. काझी परवेज हसन, डॉ. राजेंद्र भंवरिया, डॉ. राकेश कुमार आणि अभियंता मोहित शर्मा यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांद्वारे संशोधन, नवोन्मेष आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देण्याचा सरकारचा उद्देश असून, या सन्मानामुळे देशातील युवा संशोधक व वैज्ञानिकांना नवी ऊर्जा मिळणार आहे.


