अटलजींच्या शताब्दी वर्षानिमित्त वेंगुर्ल्यात भव्य सायकल रॅली व वृक्षारोपण
वेंगुर्ला | प्रतिनिधी
भारतरत्न, माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त संस्कृती मंत्रालय, भारत सरकार व कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथे भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या सायकल रॅलीचा शुभारंभ वेंगुर्ल्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला.
या कार्यक्रमास वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक सचिन बिडकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई, खर्डेकर कॉलेजचे प्राचार्य धनराज गोस्वामी, नगरसेविका अॅड. सुषमा खानोलकर, ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी, खर्डेकर कॉलेज संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, तरुण भारतचे प्रतिनिधी महेंद्र मातोंडकर, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे सचिव डॉ. सचिन परुळेकर, कोकण संस्था अध्यक्ष दयानंद कुबल, समन्वयक शशिकांत कासले, स्वाती मांजरेकर, सत्यवान भगत यांच्यासह विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सायकल रॅलीनंतर मान्यवर व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना उजाळा देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला. अटलजी हे भारताच्या राजकीय व सांस्कृतिक जीवनावर ठसा उमटवणारे प्रभावी वक्ते, संवेदनशील कवी आणि दूरदृष्टीचे नेते होते.
पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प, सुवर्ण चतुर्भुज योजना, पोखरण अणुचाचण्या यांसारख्या ऐतिहासिक निर्णयांद्वारे देशाच्या विकासाला नवी दिशा दिली. “राष्ट्र प्रथम” या तत्त्वज्ञानातून त्यांनी संपूर्ण देशाला प्रेरणा दिली.
अटलजींच्या शताब्दी जयंतीनिमित्त आयोजित ही सायकल रॅली व वृक्षारोपणाची संकल्पना युवकांमध्ये देशभक्तीची भावना, आरोग्याबाबत जागरूकता आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारी ठरली. या प्रेरणादायी उपक्रमाबद्दल आयोजक संस्था व सहभागी सर्व घटकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


