बांदा येथे गोव्यातील अवैध विदेशी मद्याची वाहतूक उघड; ११.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक
बांदा | प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभागाने बांदा येथे मोठी धडक कारवाई करत गोव्यातून अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक करणारा टाटा इंट्रा टेम्पो पकडला आहे. या कारवाईत एकूण ११ लाख ६८ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून प्रवीण महावीर बोराडे (वय ३०, रा. सोलापूर) याला अटक करण्यात आली आहे.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात गोवा बनावटीचे सुमारे ३ लाख ६८ हजार ६०० रुपये किमतीचे विदेशी मद्य तसेच सुमारे ८ लाख रुपये किमतीचा टाटा इंट्रा टेम्पो यांचा समावेश आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गोवा–मुंबई राष्ट्रीय महामार्गावर बांदा येथील हॉटेल विवा क्लासिक समोर असलेल्या इन्सुली तपासणी नाक्यावर ही कारवाई करण्यात आली. गोव्याकडून येणारा पांढऱ्या रंगाचा टाटा इंट्रा टेम्पो संशयास्पदरीत्या वाहतूक करत असल्याची माहिती पथकाला मिळाल्यानंतर मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास वाहन अडवून तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान वाहनाच्या मागील हौद्यामध्ये अत्यंत कौशल्याने चोरकप्पा तयार करून त्यावर सिमेंटच्या विटा रचण्यात आल्याचे आढळून आले. त्या विटांच्या खाली गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे ३६ बॉक्स लपवून ठेवण्यात आले होते.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख व अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.


