महावितरणच्या कंत्राटी कामगारांच्या पगाराला कात्री; आ. निलेश राणेंकडे कामगारांची धाव
कुडाळ | प्रतिनिधी
महावितरणमध्ये रात्रंदिवस सेवा देणाऱ्या कंत्राटी कामगारांवर सध्या गंभीर आर्थिक संकट ओढावले असून, पगारात कपात आणि वाढता कामाचा ताण या दुहेरी कात्रीत हे कामगार अडकले आहेत. या अन्यायकारक धोरणाविरोधात कुडाळ–मालवणचे आमदार डॉ. निलेश राणे यांची भेट घेत कंत्राटी कामगारांनी आपले गाऱ्हाणे मांडले.
महावितरणच्या विविध कामांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या वेतनात अलीकडे कपात करण्यात आली असून, त्याच वेळी कामाचा ताण मात्र लक्षणीयरीत्या वाढवण्यात आल्याचे कामगारांनी सांगितले. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले असून मानसिक व आर्थिक तणाव वाढल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
“काम तेवढेच नव्हे तर अधिक, मात्र पगारात कपात” अशी स्थिती निर्माण झाली असून प्रशासनाच्या धोरणांमुळे कामगारांवर अन्याय होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या संदर्भात आमदार डॉ. निलेश राणे यांनी कामगारांचे म्हणणे ऐकून घेत, त्यांच्या अडचणी शासनदरबारी मांडण्याचे आणि न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
कंत्राटी कामगारांनी लोकप्रतिनिधींकडून सकारात्मक हस्तक्षेपाची अपेक्षा व्यक्त केली असून, लवकरात लवकर पगार कपात मागे घेऊन न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


