रत्नागिरी स्थानकांवर कोकण रेल्वेची ‘डिजी लॉकर’ सुविधा सुरू
१६ ऑक्टोबर २०२५ पासून प्रवाशांसाठी सुरक्षित व डिजिटल सामान ठेवण्याची सोय
रत्नागिरी : कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी १६ ऑक्टोबर २०२५ पासून रत्नागिरी स्थानकांवर ‘डिजी लॉकर’ सुविधा सुरू केली आहे. या उपक्रमाचा उद्देश प्रवाशांना आधुनिक, सुरक्षित आणि स्वयंचलित पद्धतीने सामान ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.
या नव्या सुविधेमुळे प्रवासी आता यूपीआय, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड तसेच इतर डिजिटल माध्यमांचा वापर करून क्यूआर-आधारित डिजिटल पेमेंट प्रणालीद्वारे आपले सामान सुरक्षितपणे ठेवू शकणार आहेत. ही सेवा चोवीस तास उपलब्ध असल्यामुळे प्रवाशांना कोणत्याही वेळी सहज प्रवेश मिळणार आहे.
डिजी लॉकर सुविधा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना सामान सांभाळण्याचा ताण कमी होणार असून प्रवास अधिक आरामदायी होण्यास मदत होणार आहे. ही सुविधा भारत सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाशी सुसंगत असून, डिजिटलदृष्ट्या सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या संकल्पनेला चालना देणारी ठरणार आहे.
या स्वयंचलित डिजी लॉकर सुविधेमुळे प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी सुरक्षित, कार्यक्षम आणि त्रासमुक्त पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये ‘डिजिटायझिंग इंडिया’ चळवळीला बळ मिळणार आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना रत्नागिरीसह संबंधित स्थानकांवर उपलब्ध असलेल्या या डिजी लॉकर सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून, प्रवासादरम्यान अधिक आराम व सोयीचा अनुभव घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी दिली.


