शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्भीड नेतृत्वाची गरज; गणेश प्रसाद गवस यांच्या भूमिकेचे स्वागत – विलास सावंत
कणकवली : राजकारण व पक्षीय स्वार्थापेक्षा शेतकरी मोठा मानून त्यांच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभे राहणाऱ्या नेतृत्वाची आज नितांत गरज असल्याचे मत काजू बागायतदार संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते विलास सावंत यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेचे नेते गणेश प्रसाद गवस यांनी शेतकरी हितासाठी मांडलेली भूमिका स्वागतार्ह असून, प्रत्येक राजकीय पक्षात अशाच प्रकारचे निर्भीड व प्रामाणिक नेतृत्व निर्माण व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
श्री. सावंत पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे नुकसान जर चहुबाजूंनी होत असेल, तर पक्ष, पद आणि राजकारण बाजूला ठेवून स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला जागृत करणे आवश्यक आहे. गरज पडल्यास पदाचा त्याग करूनसुद्धा सर्वसामान्य शेतकरी व जनतेच्या प्रश्नांसाठी उभे राहणारे नेतृत्व आज काळाची गरज बनली आहे. “प्रत्येक पक्षात असा एक तरी गणेश प्रसाद निर्माण व्हावा,” असे ते म्हणाले.
आपला अनुभव सांगताना त्यांनी नमूद केले की, सन २००५ मध्ये ते स्वतः सत्ताधारी आघाडीतील एका पक्षाचे पदाधिकारी होते. मात्र हत्तीच्या उपद्रवामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोठ्या नुकसानीच्या प्रश्नावर त्यांनी पक्षीय भूमिका बाजूला ठेवून सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र केले. बांदा येथे जनआंदोलन उभारून शासनाला जेरीस आणले आणि हत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आवश्यक ती नुकसानभरपाई मिळवून देण्यात यश मिळाले, अशी माहिती त्यांनी दिली.
आज अनेक मित्र सत्ताधारी पक्षांमध्ये मोठ्या पदांवर आहेत; मात्र स्वतःच्या राजकीय प्रगतीपलीकडे जाऊन जनतेच्या ज्वलंत प्रश्नांसाठी प्रामाणिक प्रयत्न केले गेले नाहीत, याची खंतही श्री. सावंत यांनी व्यक्त केली.
शेवटी गणेश प्रसाद गवस यांचे आभार मानत श्री. सावंत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “नुसती पत्रकार परिषद घेऊन थांबू नका. शेतकऱ्यांसाठी ठोस कृती आराखडा जाहीर करा. वेळ पडल्यास आम्हालाही कळवा; सर्व शेतकरी, काजू बागायतदार आणि सामान्य जनतेला सोबत घेऊन आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला भाग पाडू.”
शिवसेनेने घेतलेल्या या भूमिकेमुळे शेतकरी व काजू बागायतदारांमध्ये नव्या आशेचे वातावरण निर्माण झाले असून, आता पुढील ठोस कृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
|
|


