विद्या प्रतिष्ठानमध्ये ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चे उद्घाटन
बारामती : विद्या प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या एआय केंद्राचे उद्घाटन अदानी उद्योगसमूहाचे अध्यक्ष श्री. गौतम अदानी यांच्या हस्ते, तर ज्येष्ठ नेते आदरणीय श्री. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज उत्साहात पार पडले. या प्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले.
१९७२ च्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व कृषी क्षेत्र बळकट करण्यासाठी कृषी विकास प्रतिष्ठान आणि विद्या प्रतिष्ठान या संस्थांची स्थापना करण्यात आली. त्या काळात लिहिता-वाचता येणे म्हणजे साक्षरता मानली जात होती; मात्र बदलत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयाचे ज्ञान असलेला विद्यार्थीच खऱ्या अर्थाने साक्षर ठरेल, अशी गरज निर्माण झाली असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले.
ही काळाची गरज ओळखून विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने दर्जेदार शिक्षण देण्याचे कार्य सुरू असून, नव्याने सुरू झालेल्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे त्या कार्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नव्या युगातील तंत्रज्ञानाधारित संधी उपलब्ध करून देणारे हे केंद्र त्यांच्या भविष्याचे नवे दार उघडणारे ठरणार आहे.
बारामतीच्या विकासाशी संबंधित प्रत्येक उपक्रमाचा लाभ स्थानिक नागरिकांना झाला पाहिजे, हीच भूमिका कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, संशोधन आणि कौशल्य विकास यांचा योग्य संगम साधत नव्या युगातील आव्हानांना सामोरे जाण्याचे कार्य देशभर सुरू असून, या प्रवाहात ग्रामीण विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी विद्या प्रतिष्ठानने दिशादर्शक पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या बारामतीत मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज, शारदानगर, विद्या प्रतिष्ठान अशा विविध शैक्षणिक संकुलांमध्ये एक लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. उपलब्ध सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे देशाच्या विविध भागांतून विद्यार्थी बारामतीत दाखल होत असून, पुण्यानंतर बारामती ग्रामीण भागातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र (एज्युकेशन हब) म्हणून उदयास येत आहे.
या शैक्षणिक वाटचालीत नर्सिंग कॉलेजला मंजुरी मिळाली असून त्याचा इमारतीचा आराखडाही मंजूर झाला आहे. याच परिसरात भविष्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा मानस असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करणारी आणि बारामतीचा नावलौकिक वाढवणारी ही विकासयात्रा अधिक वेगाने पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


