३१ डिसेंबर व पर्यटन हंगामात अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल

0
260
३१ डिसेंबर व पर्यटन हंगामात अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
३१ डिसेंबर व पर्यटन हंगामात अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल

३१ डिसेंबर व पर्यटन हंगामात अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल

प्रतिनिधी
३१ डिसेंबर तसेच सध्या सुरू असलेल्या पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहून अंमली पदार्थांविरोधात भरीव व प्रभावी कारवाया कराव्यात, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.

नार्को को-ऑर्डिनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त शशिकांत यादव, पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी कारवाईचा सविस्तर आढावा सादर केला. त्यानंतर जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी विभागनिहाय तसेच उपविभागनिहाय प्रगतीचा तपशीलवार आढावा घेतला.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी जिंदल म्हणाले की, कोस्टगार्डने समुद्रमार्गे होणाऱ्या वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवून बोटींची नियमित तपासणी करावी. ३१ डिसेंबर तसेच पर्यटन हंगामात जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढत असल्याने गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस आणि सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.

पोलीस विभागाने पेट्रोलिंग वाढवून गोपनीय माहिती संकलनाचे नेटवर्क अधिक मजबूत करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे प्रलंबित असलेली तडीपारीची प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.

याशिवाय, शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थविरोधी जनजागृती मोहीम राबवावी तसेच शिक्षकांनाही याबाबत अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. कृषी व वन विभागाने गांजाची लागवड होणार नाही यासाठी विशेष लक्ष ठेवावे आणि संशयास्पद बाबी आढळल्यास तातडीने कारवाई करावी, असेही जिल्हाधिकारी जिंदल यांनी स्पष्ट केले.

गांजा सेवनाच्या प्रकरणांमध्ये केवळ गुन्हा नोंदवून थांबू नये, तर तो कुठून आणला जातो, पुरवठा साखळी कुठे आहे, याचा मुळापासून तपास करून अधिकाधिक कारवाया कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

एकूणच, येत्या काळात अंमली पदार्थविरोधी मोहिम अधिक तीव्र करून जिल्हा अमली पदार्थमुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी संयुक्तपणे आणि काटेकोरपणे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी यावेळी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here