जिल्हा वार्षिक योजनेतील विकास कामे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा – पालकमंत्री नितेश राणे
(सिंधुदुर्ग प्रतिनिधी) :
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेला मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, या निधीतून हाती घेतलेली सर्व विकास कामे कालबद्ध नियोजनानुसार आणि गुणवत्तेसह जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत.
जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पुंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. परब, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, प्रत्येक विकास कामाची गुणवत्ता आणि दर्जा अबाधित ठेवणे ही संबंधित यंत्रणांची जबाबदारी आहे. कामांच्या अंमलबजावणीत कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही. जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी शाश्वत व दर्जेदार विकास कामांची काटेकोर आखणी करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, जिल्हा परिषदेला विकासासाठी उपलब्ध करून दिलेला निधी वेळेत आणि पूर्णपणे खर्च करण्याचे निर्देश देताना, कोणत्याही विभागाचा निधी अखर्चित किंवा समर्पित राहणार नाही, याची दक्षता विभागप्रमुखांनी घ्यावी, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व जबाबदारीने काम करावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.


