कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपच्या रेखा चौधरी बिनविरोध विजयी
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने विजयाचे खाते उघडले आहे. कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक १८ अ मध्ये भाजपच्या रेखा राजन चौधरी यांचा विजय जवळपास बिनविरोध निश्चित झाला आहे.
प्रभाग १८ अ ही ओबीसी महिला आरक्षित जागा असून या जागेसाठी रेखा चौधरी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरही कोणताही प्रतिस्पर्धी नसल्यामुळे भाजपला या प्रभागात निर्विवाद यश मिळाले आहे.
उद्या उमेदवारी अर्जांची कागदपत्र पडताळणी होणार असून, त्यानंतर अधिकृतपणे विजयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. या विजयामुळे कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपला उत्साहवर्धक सुरुवात मिळाली आहे.


