राज्यस्तरीय युवा महोत्सव २०२५-२६ जल्लोषात सुरू
युवक-युवतींच्या नेतृत्वगुणांना वाव देणारे प्रभावी व्यासपीठ – आयुक्त शितल तेली उगले
पुणे, दि. ३० (जिमाका वृत्तसेवा) :
युवा महोत्सव म्हणजे केवळ स्पर्धांचे आयोजन नसून, युवक-युवतींना विविध क्षेत्रांत आपले नेतृत्वगुण, सर्जनशीलता आणि सुप्त क्षमता सिद्ध करण्याचे सशक्त व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या आयुक्त श्रीमती शितल तेली उगले यांनी केले. युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन, युवकांमधील कलागुणांना चालना आणि राष्ट्रीय एकात्मता अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यस्तरीय युवा महोत्सव २०२५-२६ चे आयोजन दि. २९ डिसेंबर २०२५ ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, निगडी येथील ग. दि. माडगुळकर नाट्यगृहात करण्यात आले असून, आयुक्त श्रीमती शितल तेली उगले यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. सतिश राउत, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहायक संचालक श्री. मिलिंद दिक्षित, सहायक संचालक श्री. चंद्रशेखर साखरे, सहाय्यक संचालक कु. अर्णव महर्षी, राष्ट्रीय बाल पुरस्कारार्थी श्री. गोपाल देवांग, अर्जुन पुरस्कारार्थी (बॉक्सिंग) श्री. हितेंद्र सोमाणी, प्रथम राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी (१९९५) तसेच राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी श्री. ताहेर आसी आदी मान्यवर उपस्थित होते.
आयुक्त श्रीमती शितल तेली उगले यांनी आपल्या भाषणात युवक-युवतींनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा सकारात्मक आणि सर्जनशील वापर करून कला, शिक्षण व करिअरमध्ये यश मिळवावे, असे आवाहन केले. एआयसारखे आधुनिक तंत्रज्ञान युवकांसाठी समान संधी निर्माण करत असून, नावीन्यपूर्ण विचारातून स्वतःचे कौशल्य सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले. येथून जाताना केवळ प्रमाणपत्रे व छायाचित्रे नव्हे, तर उज्ज्वल भविष्य घडविणारी सकारात्मक ऊर्जा सोबत घेऊन जा, असेही त्यांनी सांगितले.
अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. सतिश राउत यांनी युवकांना प्रेरणादायी उदाहरणे देत यशासाठी आवश्यक असलेल्या चिकाटी, सातत्य आणि आत्मविश्वासाचा कानमंत्र दिला. तसेच लेखनाची आवड असलेल्या युवकांनी दर्जेदार साहित्यनिर्मिती करून मराठी साहित्य अधिक समृद्ध करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रास्ताविकात पुणे क्रीडा व युवक कल्याण विभागाचे उपसंचालक श्री. युवराज नाईक यांनी महोत्सवाची माहिती देत सहभागी युवक-युवतींसाठी निवास, भोजन, किट आदी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले.
या राज्यस्तरीय युवा महोत्सवात पुणे, कोल्हापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती,
नाशिक व मुंबई या आठ विभागांतून १५ ते २९ वयोगटातील एकूण ३१२ युवक-युवती सहभागी झाले आहेत. लोकगीत, लोकनृत्य, कथालेखन, चित्रकला, वक्तृत्व, काव्यलेखन आदी विविध कला प्रकारांच्या स्पर्धा या महोत्सवात आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांतील विजयी संघ दि. १० ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
उद्घाटन समारंभात ‘जय मल्हार’ फेम अभिनेत्री श्रीमती ईशा केसकर तसेच ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील अभिनेता श्री. अक्षय टांगसाळे यांनी उपस्थिती लावली. पोवाडा आणि लावणीच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जगन्नाथ लकडे यांनी केले.


